मतमोजणी आज पॉलिटेक्निकल कॉलेज येथे होणारनांदेड ः नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील 81 नगरसेवकांच्या निवडीसाठी गुरुवारी (दि. 15 जान

मतमोजणी आज पॉलिटेक्निकल कॉलेज येथे होणार
नांदेड ः नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील 81 नगरसेवकांच्या निवडीसाठी गुरुवारी (दि. 15 जानेवारी) सकाळी 7.30 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत शहरात एकूण 41.65 टक्के मतदान झाले. किरकोळ घटना वगळता महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.
शहरातील काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या, तर काही केंद्रांवर तुलनेने तुरळक मतदार उपस्थित होते. सकाळी मतदानास सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला होता, मात्र दहा वाजल्यानंतर मतदारांचा ओघ वाढू लागला. सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत 7.16 टक्के, तर 9.30 ते 11.30 या वेळेत 17.14 टक्के मतदान झाले. दुपारनंतर काहीशी गर्दी कमी झाली असली, तरी सायंकाळी काही मतदान केंद्रांवर पुन्हा रांगा लागलेल्या दिसून आल्या.
तब्बल सात वर्षांनंतर नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक होत असल्याने शहरातील मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. प्रशासक राजवटीतून मुक्त होणार या भावनेने नागरिक मतदानासाठी बाहेर पडले होते. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी 491 उमेदवार रिंगणात असून, प्रभाग क्रमांक 1 ते 19 मध्ये प्रत्येकी 4 तर प्रभाग क्रमांक 20 मध्ये 5 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, शहर विकास आघाडी आदी प्रमुख राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. दक्षिण नांदेडमध्ये काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी तसेच शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची युती वगळता बहुतांश पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. शहरातील उत्तर व दक्षिण भाग मिळून एकूण 5 लाख 1 हजार 799 मतदार या निवडणुकीत मतदानासाठी पात्र होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाचे सुमारे 70 क्षेत्रीय अधिकारी व 3 हजार कर्मचारी, तर पोलीस प्रशासनाचे 3 हजार 200 जवान तैनात करण्यात आले होते. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि. 16 जानेवारी रोजी पॉलिटेक्निकल कॉलेज येथे मतमोजणी होणार असून, त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. सात वर्षांनंतर होणार्या या निवडणुकीच्या निकालाकडे नांदेडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS