अहिल्यानगर : विधानसभा आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारू विक्रीविरोधात महिन्याभरात ३९१ गुन्हे दाखल करत २ को
अहिल्यानगर : विधानसभा आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारू विक्रीविरोधात महिन्याभरात ३९१ गुन्हे दाखल करत २ कोटी ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ३९६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अवैध दारु विक्री,निर्मिती,वाहतूक व हातभट्टी दारुविक्री विरोधात अहिल्यानगर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व भरारी पथकांनी १५ ऑक्टोंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत मोहीम राबविली. या मोहीमेत १ लाख ६ हजार ३६५ लीटर रसायन, ६ हजार ८९८ लीटर हातभट्टी, १ हजार २८९ लीटर देशी मद्य, २ हजार २४९ लीटर विदेशी मद्य, १८ हजार ३०४ लीटर बीअर, १ हजार ५०५ लीटर ताडी जप्त करण्यात आली. या गुन्ह्यांत एकूण ५६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार सह आयुक्त प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अहिल्यानगर अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर देखील कडक कारवाई करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या कारवायामध्ये सातत्य राहणार आहे. तसेच निवडणूक अनुषंगाने कोरडे दिवस जाहीर करण्यात आले असून सदरील दिवशी अवैध मद्यावर तसेच कोणत्याही प्रकरची मद्यविक्री होणार नाही याकरिता राज्य उत्पादन शुल्क, विभाग व पोलीस विभाग यांची त्यावर करडी नजर असणार आहे. अवैध मद्याविषयी तक्रारी असल्यास टोल फ्री क्रमांक – १८००२३३९९९९, व्हॉटस्अॅप क्रमांक ८४२२००११३३ किंवा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगर कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२४१-२४७०८६० वर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहिल्यानगर विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
COMMENTS