Homeताज्या बातम्यासंपादकीय

भ्रष्ट मनोर्‍याचे 16 बळी

मुंबईमध्ये धुळीच्या वादळाच्या तांडवानंतर कोसळलेल्या होर्डिंगमुळे तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आहे. वास्तविक पाहता त्या 16 जणांची कोणतीही चुकी नसता

काँगे्रस-ठाकरेंतील कुरघोडीचे राजकारण
ब्रिटनमधील सत्तांतराचा अन्वयार्थ
दाभोळकर हत्या तपास आणि न्याय

मुंबईमध्ये धुळीच्या वादळाच्या तांडवानंतर कोसळलेल्या होर्डिंगमुळे तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आहे. वास्तविक पाहता त्या 16 जणांची कोणतीही चुकी नसतांना त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 16 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचे सोयरसुतक कुणालाही नसल्याचे दिसून येत आहे. कारण राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्‍या झडतांना दिसून येत आहे. सत्ताधारी जबाबदारी स्वीकारला तयार नाहीत. या होर्डिंग्ज तत्कालीन म्हणजे उद्धव ठाकरे सत्तेवर असतांना त्यांच्या काळातील असल्याचा आरोप होतांना दिसून येत आहे. मात्र तुम्ही सत्तेवर आल्यानंतर हे होर्डिंग्ज का हटवले नाहीत, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे जबाबदारी दुसर्‍यावर ढकलणे सत्ताधार्‍यांचे नित्याचेच झाले आहे. खरंतर सत्तेत तुम्ही असल्यामुळे जबाबदारी तुमचीच आहे. भलेही गतकाळच्या सरकारने काही चुकीचे निर्णय घेतले असतील तर, त्यात बदल करणे, सुधारणा करणे, सत्ताधारी म्हणून तुमची जबाबदारी असतांना, ती जबाबदारी टाळणे म्हणजे दुर्घटनेपासून पळ काढण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या निष्पाप लोकांच्या मृत्यूस जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. खरंतर महाराष्ट्रातच नव्हेतर देशभरात महाकाय होर्डिंग लावण्यात येतात. काही होर्डिंग या अधिकृत असतात, तरी त्यातील शक्यता तपासल्या जात नाहीत. तर दुसरीकडे अनेकठिकाणी अनाधिकृत होर्डिंग लावण्यात येत असल्याचे देखील उघड झाले आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीचा मौसम असल्यामुळे या होर्डिंगला ऊत आला आहे. दुर्घटना घडल्यानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.

मुंबईच्या सर्व वॉर्डमधील होर्डिंगचा आढावा घेऊन धोकादायक होर्डिंग हटवण्याचे आदेश सहायक आयुक्तांना दिल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सर्व बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र दुर्घटना होण्याआधीच जर बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्यात आली असती तर तब्बल 16 जणांचा जीव वाचला असता. मात्र मुंबई महापालिका असो वा सत्ताधारी असो, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतांना दिसून येत नाही. आजकाळ अधिकारी वर्गांची नीतिमत्ता प्रामाणिक राहिलेली नसल्याचे दिसून येत आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची संख्या नगण्यच आहे. खरंतर अधिकारी वर्गांनी नियमानुसारच कामकाज करण्याची गरज आहे. आणि कर्तव्यदक्ष अधिकार्‍याने लोकप्रतिनिधींच्या आदेशाला जुमानले नाही तर, संबंधित अधिकार्‍याची बदली करण्यात येते. मात्र बदली केल्यानंतर देखील नवीन आलेल्या अधिकार्‍याने जुन्या अधिकार्‍याप्रमाणेच आपला प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षपणा जपला तर शेवटी लोकप्रतिनिधींनाच बदलावे लागेल. कारण कोणत्याही अधिकार्‍याला आपण या जागेवर आणले तरी, आपले काम होत नाही, याची जाणीव या लोकप्रतिनिधींना झाल्यास आपल्या मर्जीतील अधिकारी त्याठिकाणी आणण्याची तसदी लोकप्रतिनिधी करणार नाही. त्यासाठी अधिकारी वर्गांने बेकायदेशीर कामास नाही म्हणण्याचे शिकून घेतले पाहिले. शिवाय होर्डिंग्ज कोसळून घाटकोपरला झालेल्या अपघाताची रेल्वे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. हा कोसळलेला बोर्ड लावायला जीआरपीने 2021 मध्ये परवानगी दिली होती. रेल्वेचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी ही परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. आता या प्रकरणाची जीआरपीकडून चौकशी सुरू आहे. होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी युगो कंपनीचा मालक भावेश भिंडेसह कंपनीचे संचालक, अधिकारी, शासकीय कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. भावेश भिंडेसह इतर आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी दोन विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. घरासह कार्यालयात छापा टाकल्यानंतर भावेश हा पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याच्यावर 23 फौजदारी गुन्हे दाखल असून बलात्काराच्या आरोपावरून त्याला अलीकडेच अटकही झाली होती. त्यामुळे होर्डिग्जप्रकरण वर-वर साधे वाटत असले तरी, त्यात अनेकांचे हात अडकल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS