वेब टीम : चंदिगढ कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे नवीन मुख्यमंत्री कोण असतील? याबाबत काँग्रेसचे मंथन सुरू होते. राज्यातील जन
वेब टीम : चंदिगढ
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे नवीन मुख्यमंत्री कोण असतील? याबाबत काँग्रेसचे मंथन सुरू होते. राज्यातील जनतेला देखील याबाबत उत्सुकता लागली होती.
विशेष म्हणजे अंबिका सोनी यांच्या नकारानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू, त्यांचे निकटवर्ती सुखजिंदर रंधावा आणि सुनील जाखड शर्यतीत दिसत होते.
सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस हायकमांडचे निरीक्षक अजय माकन, हरीश चौधरी आणि पंजाब प्रभारी हरीश रावत आमदारांचे अभिप्राय नव्याने घेत आहेत. निरीक्षक फोनवरून आमदारांचे मतही जाणून घेत असून मुख्यमंत्री म्हणून तुमची कोणाला पसंती आहे याबाबत विचारणा सुरु आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्याच्या 24 तासांनंतर अखेर पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. काँग्रेसचे दलित नेते चरणजीत सिंह चन्नी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. पक्षाचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विट करून कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून चन्नी यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती दिली.
चरणजीत सिंह चन्नी सलग तीन वेळा चमकौर साहिबमधून आमदार झाले. 2007 मध्ये ते अपक्ष म्हणून विजयी झाले. यानंतर ते दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. ते 2015 ते 2016 पर्यंत पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
चन्नी रामदासिया शीख समुदायाचे आहेत. 2017 मध्ये, जेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा त्यांना तंत्रशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री करण्यात आले.
अमरिंदर सिंह यांच्या विरोधात ऑगस्टच्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये चन्नी प्रमुख होते. पंजाबचे प्रश्न सोडवण्यासाठी अमरिंदरवर आमचा विश्वास नाही, असे ते म्हणाले होते.
COMMENTS