सिव्हीलच्या दारात उपचाराअभावी कोरोनाबाधिताचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हीलच्या दारात उपचाराअभावी कोरोनाबाधिताचा मृत्यू

ऑक्सिजन बदलण्यास उशीर झाल्याने दोन रुग्णांच्या मृत्यूचा प्रकार समोर आल्यानंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आणखी एक वेदनादयी प्रकार समोर आला आहे.

ग्रामीण भागातील महिला बचतगटांचा ‘सुपर शॉपींग मॉल’
आ. जगतापांच्या भाजप कार्यालय भेटीवर परिवार नाराज? ; भाजप श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतल्याची चर्चा
शिवचरित्र व्याख्याता ओंकार व्यवहारे याने सादर केला ‘शिवतीर्थ’चा देखावा

अहमदनगर/प्रतिनिधी: ऑक्सिजन बदलण्यास उशीर झाल्याने दोन रुग्णांच्या मृत्यूचा प्रकार समोर आल्यानंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आणखी एक वेदनादयी प्रकार समोर आला आहे. श्रीरामपूरहून आलेल्या अत्यवस्थ रुग्णाला बेड न मिळाल्याने त्याचा दारातच मृत्यू झाला. मृतदेह दोन तास वाहनातच पडून होता. 

सरकारी आणि खासगी रुग्णालयांत खाटा उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेतच ठेवून ऑक्सिजन देण्याची वेळ आल्याचे चित्रही नगरमध्ये पाहायला मिळत आहे. श्रीरामपूर येथील एका रुग्णाची अशीच हृदयद्रावक अवस्था समोर आली आहे. रुग्ण गंभीर झाल्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. नातेवाइक खासगी वाहनातून रुग्णाला घेऊन आले; मात्र त्या वेळी जिल्हा रुग्णालयात जागा नव्हती. त्यामुळे त्यांना इतरत्र जाण्याचा सल्ला देण्यात आला. नातेवाइकांनी शहरातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये फिरून पाहणी केली; मात्र कोठेही बेड शिल्लक नव्हता. त्यामुळे रुग्णाला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले; मात्र तेथे आणत असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला. याची माहिती नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाला देऊन मृतदेह वाहनातून काढून आत घेण्याची विनंती केली; मात्र यासाठीही तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. तोपर्यंत मृतदेह वाहनातच असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन मात्र या घटनेवर काहीही बोलायला तयार नाही. नगर शहरातील सर्व रुग्णालयांची क्षमता संपली आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून ती व्यवस्था अपुरी आहे. शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे. त्यानुसार तीन हजार सातशे बेड उपलब्ध होणार असले, तरी त्यातील आधीच बहुतांश बेड फुल आहेत. शिवाय त्यामध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची संख्याही अपुरी आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले, की जिल्ह्यात बेडची कमतरता आहे. यासाठी बेड आरक्षित करण्यात येत आहेत. याशिवाय 31 नवी कोविड केअर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी बेड उपलब्ध होऊ शकतील. यंत्रणा उभारण्यावर प्रशासनाचा भर आहे.

COMMENTS