अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यात वाळकी येथे दोन शेजार्यांमध्ये सायकल लावण्याच्या किरकोळ कारणातून वाद झाले. या वादात जावेद गनीभाई तांबोळी (वय 35) या
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यात वाळकी येथे दोन शेजार्यांमध्ये सायकल लावण्याच्या किरकोळ कारणातून वाद झाले. या वादात जावेद गनीभाई तांबोळी (वय 35) या तरुणाच्या डोक्यात दगड घालून व धारदार शस्त्राने मारून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना नगर तालुक्यातील वाळकी येथील स्टेट बँके समोर चौकात घडली. या घटनेत इतर दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत जावेदचे वडील गनीभाई तांबोळी जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सलीम शेख (वय 40) व बाबा शेख (वय 40) यांना ताब्यात घेतले आहे.
वाळकी येथे शेजारी-शेजारी राहणार्या दोन कुटुंबात सायकल लावण्याच्या कारणावरुन वाद झाले. या वादाच्या रागातून वाळकी येथील भांड्याचे व्यापारी गनीभाई तांबोळी यांचा मुलगा जावेद याला धारदार शस्त्राने मारून व डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला. या घटनेने वाळकी हादरली असून काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. वाळकी गावामध्ये तांबोळी व शेख हे एकमेकांच्या शेजारी राहतात. रविवारी सकाळी तेथील लहान मुलांमध्ये भांडणे झाली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील मोठ्या व्यक्तींमध्ये वाद झाले. यावेळी जावेद याला पाईपने मारहाण करण्यात आलेली होती. त्यानंतर तो नगर येथे शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेला होता. त्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात जात असताना गावातील काही लोकांनी त्याला, ’तू गावामध्ये पुन्हा ये, आपण जे काय असेल ते मिटवून घेऊ’, असे सांगितले. त्यामुळे तक्रार न देताच तो परत आला.
त्यानंतर दुपारच्या सुमाराला जावेद हा त्याच्या गावी म्हणजेच वाळकी येथे असताना शेख यांच्यासह अन्य काही लोकांनी जावेद व त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केली. दोन्ही गटात झालेल्या मारहाणीत काही जणांनी जावेद याला अडवले व एकाने त्याच्या डोक्यामध्ये व छातीवर दगड घातला. जावेद हा जागीच कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ नगर येथील आनंदऋषी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, तो उपचारापूर्वीच मृत झाला असल्याचे सांगितले. ज्या भागात घटना घडली, त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अन्य काही जणांचा शोध सुरू आहे.
COMMENTS