राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटे व्यावसायिक, गरीब यांच्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे.
मुंबई/प्रतिनिधी: राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटे व्यावसायिक, गरीब यांच्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. त्यात आणखी काही घटकांचा या पॅकेजमध्ये समावेश करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पटोले यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे.
शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि इतर काही छोटे व्यावसायिक यांनाही मदतीची गरज असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे. त्याचे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत आहे. लोकांचे जीव वाचवणे ही आपली प्राथमिकता असून, त्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे सरकारबरोबर उभा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोट्या व्यावसायिकांकरिता पॅकेज जाहीर केले आहे; पण या पॅकेजमध्ये आणखी काही घटकांचा समावेश करणे गरजेचे असून त्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका असल्याचे पटोले म्हणाले. त्यात शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले यांचा त्यांना आवर्जून उल्लेख केला आहे. संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे या शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. तसेच सलूनची दुकाने बंद असल्याने या व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येईल. शिवाय मुंबईतील महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ द्यावा, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.
COMMENTS