प्रतिनिधी : ठाणे शिवसेनेने विरोध केलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रॉजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग अखेर मोकळा झा
प्रतिनिधी : ठाणे
शिवसेनेने विरोध केलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रॉजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग अखेर मोकळा झाला. विशेष म्हणजे शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेतील शिवसेनेने यापूर्वी जागा हस्तांतर करण्याचा प्रस्ताव तब्बल चार वेळा फेटाळून लावला होता.
मात्र काल दप्तरी दाखल केलेला प्रस्ताव बुधवारी झालेल्या महासभेत अवघ्या काही सेकंदात कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आला. बुलेट ट्रेनबाबतची विरोधाची भूमिका शिवसेनेने बदलल्याने वेगवेगळे अर्थ लावण्यात येत आहेत.
बुलेट ट्रेनकरिता ज्या शेतकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यांना योग्य मोबदला मिळाला असल्याने महापालिकेचे नुकसान कशासाठी करायचे, असे सांगत शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला.
मुंबईतील मेट्रोचे कारशेड आरे कॉलनीतून हलवून कांजूरमार्ग येथे उभारण्यावरून राज्य आणि केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी मोठा वाद झाला होता.
त्यामुळे ठाणे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने केंद्राच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला जागा हस्तांतरित करण्यास विरोध केला.
महापालिका प्रशासनाकडून बुलेट ट्रेनसाठी जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर चार वेळा मंजुरीसाठी आणूनही तो फेटाळण्यात आला व अखेर दफ्तरी दाखल केला.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. त्यावेळी राज्य शासनाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेनंतर मोदी-ठाकरे यांच्यात बंद दरवाजाआड बैठक झाली होती.
केंद्र सरकारने मेट्रो कारशेडकरिता कांजुरमार्ग येथील मिठागरांची जमीन दिल्यास बुलेट ट्रेनच्या जमीन संपादनातील अडथळे दूर करण्याबाबत उभय नेत्यांच्या बैठकीत समझोता झाल्याची चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात गेले काही दिवस सुरू होती.
बुधवारी झालेल्या महासभेत पुन्हा हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे संकेत यापूर्वीच ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेने दिले होते. शिवसेनेकडून जागा हस्तांतरण प्रस्तावाला विरोध केल्याने शेतकऱ्यांनी शिवसेनेकडे नाराजी व्यक्त केली होती.
तसेच बहुतांश जागेचे अधिग्रहण करण्यात आल्याने शिवसेनाही हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अनुकूल असल्याचे चित्र निर्माण झाले होते. बुधवारी हा प्रस्ताव फारशा चर्चेविना मंजूर झाला.
COMMENTS