राज्यात ‘ईडी’ व ‘सीबीआय’चे छापे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात ‘ईडी’ व ‘सीबीआय’चे छापे

‘शाओमी’चे 5 हजार 551 कोटी रुपये जप्त ; अविनाश भोसले यांच्यासह 8 ठिकाणांवर सीबीआयची कारवाई

मुंबई : राज्यात शनिवारी मोठया प्रमाणावर पुन्हा एकदा सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे मोठया प्रमाणावर छापे पडल्याचे दिसून आले. चीनची स्मार

देशात आढळला कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण
पाकिस्तानच्या आशा जिवंत तर श्रीलंकेच्या संपुष्टात
 50  खोके एकदम ओके चे विधानसभेत पुन्हा झळकले बॅनर 

मुंबई : राज्यात शनिवारी मोठया प्रमाणावर पुन्हा एकदा सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे मोठया प्रमाणावर छापे पडल्याचे दिसून आले. चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीला ईडीने जोरदार दणका दिला आहे. ईडीने शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लिमेटेडचे 5 हजार 551 कोटी 27 लाख रुपये जप्त केले आहेत. परकीय चलन विनिमय कायदा 1999 नुसार (फेमा कायदा) ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांच्यासह 8 ठिकाणी सीबीआयने मोठया प्रमाणात छापेमारी केली.
कंपनीला फेब्रुवारी 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात परदेशात निधी पाठवला होता. त्यासंदर्भात ईडीने कारवाई केली आहे. ईडीकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी शाओमी आणि ओप्पो या कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली होती. शाओमी आणि ओप्पो सारख्या दोन मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांच्या समूह कंपन्यांना रॉयल्टीच्या रूपात परदेशात पैसे पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या दोन्ही कंपन्यांवर आणि या दोन कंपन्यांशी संबंधित पदाधिकार्‍यांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. त्यापैकी शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लिमेटेडवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, अविनाश भोसले प्रकरणात डीएचएफएलचे प्रवर्तक असलेल्या कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांच्याशी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयासोबतच (ईडी) सीबीआयसूद्धा गुन्हा दाखल करुन तपास करत आहे. सीबीआयने केलेल्या तपासात रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांचा गुन्ह्यातील सहभाग समोर आला. रेडियस ग्रुपने मुंबईच्या उपनगरात सुमेर ग्रुपसोबत भागिदारीत असलेल्या एका निवासी प्रकल्पासाठी डीएचएफएलकडून तब्बल 3 हजार 94 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज व्याजासह थकीत आहे. सीबीआयने अखेर गुरुवारी रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना अटक केली. त्यानंतर आता सीबीआयने पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह अन्य दोघांकडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे.
येस बँक घोटाळा प्रकरणात सीबीआयने रेडियस ग्रुपचे बिल्डर संजय छाब्रिया याला गुरुवारी अटक केली होती. या प्रकरणी सीबीआयकडून संशयितांची मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी असलेली निवासस्थाने आणि कार्यालयांची झडती घेतली जात आहे. येस बँक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुंबईतील बिल्डर संजय छाब्रिया यांना सीबीआयच्या न्यायालयाने 6 मेपर्यंत कोठडी सुनावली आहे. या घोटाळा प्रकरणात याआधी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

राजकीय कनेक्शन
येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने बांधकाम व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना अटक केल्यानंतर मुंबई आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या सर्वांचे मोठे राजकीय कनेक्शन असून सीबीआयच्या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS