सोमेश्वरनगर (जि. पुणे) : राज्यावर कोरोना, वादळे, महापूर, अतिवृष्टी, अशी संकटे येत आहेत. यात भरडलेला शेतकरी जगला पाहिजे म्हणून विकास कामांना कात्
सोमेश्वरनगर (जि. पुणे) : राज्यावर कोरोना, वादळे, महापूर, अतिवृष्टी, अशी संकटे येत आहेत. यात भरडलेला शेतकरी जगला पाहिजे म्हणून विकास कामांना कात्री लावून मदत करत आहोत. अर्थसंकल्प सादर करताना अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. सोमेश्वर कारखान्याच्या गव्हाण पूजनासह गाळप हंगामाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. याप्रसंगी आ. संजय जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवाकाते, डॉ. दिगंबर दुर्गाडे, डी. के. पवार, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, नीता फरांदे, तुकाराम जगताप उपस्थित होते.
ना. पवार म्हणाले, दोन लाखांवरील कर्जदार आणि नियमित भरणा करणारे अजूनही लाभापासून वंचित आहेत. पण त्यामुळेच तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाने पीककर्ज देण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. गुंजवणीचे पाणी गराडे व नाझरे धरणात सोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुंजवणीबाबत मी, सुप्रिया सुळे, संजय जगताप, संग्राम थोपटेंची बैठक झाली. गुंजवणी-भोर यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत आणि पुरंदरचीही जमीन ओलिताखाली आली पाहिजे. म्हणून कसरत करावी लागत आहे. सोमेश्वरचा जादा ऊस आपल्याच भावात अन्य कारखान्यांनी न्यावा यासाठी प्रयत्नशील आहे.
शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे म्हणाले, “माझ्याजवळ अजितदादा नावाचे सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळे माझा मुलगा जरी संचालक मंडळात असला तरी कामकाजात काही चुकीचे वाटल्यावर मी अजितदादांकडे दाद मागणार. शेतकरी कृती समिती कायम त्यांच्यासोबत राहील. मात्र, एकरकमी एफआरपी शेतकर्यांना मिळायलाच हवी.
‘भाजप’मधील आरोप करणार्यांना आव्हान
बंद कारखाने चालवायला घेण्यावरून भाजपमधून पवारांना टार्गेट केले जात आहे. संबंधितांना जाहीर आव्हान देताना पवार म्हणाले, राज्य सहकारी बँकेने 12 सहकारी साखर कारखाने चालवायला देण्यासाठी टेंडर काढले आहे. ज्यांना वाटत असेल तिथल्या शेतकर्यांना आपण न्याय देऊ शकतो त्यांनी टेंडर भरा. चांगल्या भावासोबत बोनस-पगार-वाहतूक-तोडणी यापोटी चांगला मोबदला देणार असाल, तर जरूर कारखाना चालवायला घेण्याचे भाजपच्या नेत्यांना आवाहन केले आहे. यास ते किती प्रतिसाद देत आहेत, त्यावरून त्यांचे शेतकर्यांवरील खरे प्रेम दिसून येईल.
COMMENTS