’यास’चा उत्तरकेडील राज्यांना अतिदक्षतेचा इशारा ; मोदी आज पश्‍चिम बंगाल, ओडिशाचा दौरा करणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’यास’चा उत्तरकेडील राज्यांना अतिदक्षतेचा इशारा ; मोदी आज पश्‍चिम बंगाल, ओडिशाचा दौरा करणार

’यास’ चक्रिवादळाने पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाला जबर तडाखा बसला आहे. आता हे वादळ पुढे सरकले असून ते झारखंडमध्ये दाखल झाले आहे. झारखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

मोहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात
‘इस्रो’ रचणार नवा इतिहास
चहा चांगला नसल्याच्या वादातून कँटिनमधल्या मुलाची हत्या | LokNews24

नवी दिल्लीः ’यास’ चक्रिवादळाने पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाला जबर तडाखा बसला आहे. आता हे वादळ पुढे सरकले असून ते झारखंडमध्ये दाखल झाले आहे. झारखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे हवामान विभागाने उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांना अति दक्षतेचा इशारा दिला आहे. अलर्ट जारी केला आहे. ’यास’ चक्रीवादळाचा जबर तडाखा बसलेल्या पश्‍चिम बंगाल आणि ओडिशातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी करणार आहेत. 

    मोदी हे सर्वांत आधी ओडिशाची राजधानी भुवनेश्‍वरला जातील आणि तिथे बैठक घेऊन आढावा घेतील. त्यानंतर मोदी हे बालासोर, भद्रक आणि पूर्व मिदनापूरची हवाई पाहणी करतील. या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. मोदी हे पश्‍चिम बंगालमध्ये आढवा बैठक घेतील. पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा दिल्यानंतर ’यास’ चक्रीवादळ हे पुढे सरकले आहे; पण या वादळामुळे हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. पश्‍चिम बंगाल आणि ओडिशात 20 लाखांहून अधिक नागरिकांना वादळाचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पाऊस आणि घरे कोसळल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन मृत्यू ओडिशातील आणि एक बंगालमधील आहे. पश्‍चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील दिघा, शंकरपूर, मंदारमनी आणि दक्षिण 24 परगना जिल्ह्यानंतर बकखाली, संदेशखाली, सागर, फ्रेजरगंज आणि सुंदरबन या भागांसह पूर्ण बंगालमध्ये एकूण तीन लाख नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. 134 बांध फुटले आहेत. आता ते दुरुस्त केले जात आहेत. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 28 व 29 मे रोजी हेलिकॉप्टरने चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाचा दौरा करणार आहेत. ’यास’ चक्रीवादळामुळे रांचीमध्ये तर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता झारखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या आठ कंपन्या तैनात आहेत. हवामान खात्याचे वरिष्ठ वैज्ञानिक आर. के. गेनामी यांच्या म्हणण्यानुसार, ’यास’ वादळाचा परिणाम पुढच्या 36 तासांपर्यंत दिसून येऊ शकतो. झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशसह पश्‍चिम बंगाल आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसासह ’रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दहा जणांना वाचविण्यात यश

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने ओडिशातील जगतसिंहपूर येथे एक अभूतपूर्व शोधमोहीम यशस्वीरित्या पार पाडली. यात दहा जणांना वाचवण्यात जवानांना यश आले. चक्रीवादळाच्या तडाख्यात एक बोट नदीत बुडाली, तेव्हा प्रसंगावधान राखत एक मोठे ऑपरेशन हाती घेत अंधारात सर्व जणांचे प्राण वाचवले. या ऑपरेशन दरम्यान जवानांकडे सुरक्षेसाठी केवळ लाईफ सेविंग बोट आणि टॉर्च इतकेच  होते. रात्रीच्या अंधारात एक बोट नदीत बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रात्रीची वेळ असल्याने रेस्क्यू ऑपरेशन करणे कठीण काम होते; परंतु राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक घटनास्थळी पोहचली आणि त्यांनी ऑपरेशन हाती घेतले.

COMMENTS