महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. सकाळपासूनच केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. स

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. सकाळपासूनच केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार राज्यात सरासरी ६२% ते ६५% मतदान झाल्याचा अंदाज आहे. २९ महानगरपालिकांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. या निकालातून राज्याच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे. सकाळी १०:०० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला ‘टपाली’ मतांची मोजणी केली जाईल. सकाळी १०:३० वाजता ईव्हीएममधील (EVM) पहिल्या फेरीचे कल हाती येण्यास सुरुवात होईल. दुपारी १२:३० वाजता बहुतांश वॉर्डांमधील चित्र स्पष्ट होईल आणि कोण आघाडीवर आहे याचा कल समजेल. दुपारी ३:०० वाजेपर्यंत अनेक महानगरपालिकांचे अधिकृत निकाल आणि विजयी उमेदवारांच्या घोषणा सुरू होतील. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी झालेली राजकीय गणिते खरोखरच ‘अंदाधुंद’ आणि आश्चर्यकारक राहीली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेली राजकीय समीकरणे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्टपणे उमटली आहेत. ठाकरेंचे अनोखे पुनर्मिलन (शिवसेना युबीटी + मनसे)
या निवडणुकीतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे तब्बल २० वर्षांनंतर एकत्र येणे. ‘मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी’ या दोन्ही चुलत भावांनी मुंबई आणि इतर महत्त्वाच्या महापालिकांसाठी हातमिळवणी केली आहे. त्यांनी ‘वचननामा, शब्द ठाकऱ्यांचा’ हा संयुक्त जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. पुण्यात ‘राष्ट्रवादी’चे दोन्ही गट एकत्र आले. राज्याच्या राजकारणात अजित पवार आणि शरद पवार एकमेकांविरुद्ध असले तरी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मात्र वेगळेच चित्र दिसले. मते विभागली जाऊ नयेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (अजित पवार गट आणि शरद पवार गट) स्थानिक पातळीवर एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. मुंबईतील ‘महायुती’ विरुद्ध ‘ठाकरे-मनसे’ ही लढत दिसली. मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढत आहेत. भाजपने ‘हिंदुत्व’ आणि ‘मराठी’ कार्ड खेळत मुंबईचा महापौर आपलाच असेल असा दावा केला आहे. तर, मुंबईत काँग्रेसने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे मुंबईत तिरंगी किंवा चौरंगी लढत झाली आहे. स्थानिक पातळीवरील विचित्र युत्या दिसल्या या निवडणुकीत. काही ठिकाणी तर विचारधारेला पूर्णपणे छेद देणाऱ्या युत्या पाहायला मिळाल्या. अंबरनाथ येथे चक्क भाजप आणि काँग्रेस यांनी स्थानिक पातळीवर हातमिळवणी केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या दोन परस्परविरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर येथे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आली आहे. भिवंडी येथे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे लढले, तर महायुती एकत्र राहीली. या निवडणुकांमध्ये ‘कोण कोणासोबत आहे’ हे ओळखणे सर्वसामान्य मतदारासाठी कठीण झाले, कारण प्रत्येक शहरात स्थानिक सोयीनुसार पक्षांनी आपल्या आघाड्या बदलल्या आहेत. महायुतीतील पक्ष अनेक ठिकाणी स्वतंत्र लढत असले तरी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २९ महानगरपालिकांची निवडणूक लढवली. फडणवीस या निवडणुकीत सब पे भारी ठरले. निकाल बंदिस्त असला तरी, मतदान होत असतानाच ठाकरे बंधूंनी मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर विविध आरोप केले. यातूनच एक बाब स्पष्ट होते की, भाजप आणि त्यांच्या एनडीए आघाडीत असलेल्या पक्षांची सरशी होणार असा अंदाज दिसतो. ज्या राज ठाकरेंनी मुंबई येथील शिवाजी पार्कवरील सभेत नकाशा दाखवत मतदान फिरवल्याची जी चर्चा पसरली होती; त्यात काही तत्थ्य नव्हते, असेच सूर ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोग आणि भाजपवर केलेल्या आरोपातून दिसताहेत. दरम्यान, भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा राजकीय दावा करत निवडणूक निकालांबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह सहा महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे.

COMMENTS