Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेत येणार महायुतीची सत्ता ; एक्झिट पोलचा अंदाज

मुंबई : महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जनमतच

मुंबईत महायुतीचा विजय अटळ ः मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई महापालिकेत भाजपाच असल्याची चिन्हे!
मुंबई महापालिका निवडणूक: जागावाटपावरून रामदास आठवलेंची मोठी घोषणा; महायुतीला घरचा आहेर!


मुंबई : महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जनमतच्या एक्झिट पोलनुसार मुंबई महानगरपालिकेत सत्ताबदल होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या अंदाजानुसार भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीला एकूण 138 जागा मिळू शकतात. तर शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि शरद पवार गट मिळून सुमारे 62 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस-वंचित आघाडीला 20, तर इतरांना 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच प्रमुख पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली होती. याच निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा आक्रमकपणे मांडत मराठी मतदारांना भावनिक साद घातली होती. सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता ठाकरे गटाला फायदा होईल, असे चित्र होते. मात्र, एक्झिट पोलमधील आकडे वेगळीच दिशा दाखवत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, रुद्र रिसर्चच्या अंदाजानुसार मुंबईत भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला 121 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीला 71 जागा, काँग्रेस-वंचित आघाडीला 25, तर इतरांना 10 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. साम या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार वसई-विरारमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि इतर पक्षांमध्ये चुरस दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना (शिंदे गट) सर्वाधिक जागा जिंकण्याची शक्यता असून त्यांना सुमारे 57 जागा मिळू शकतात. भाजप 42 जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी गट, ठाकरे गट, वंचित आणि इतर पक्षांना मर्यादित जागांवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जवळपास बरोबरीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपाला सुमारे 28, तर शिंदे गटाला 29 जागा मिळू शकतात. शरद पवार गट, अजित पवार गट, काँग्रेस, मनसे आणि स्थानिक पक्षांनाही काही जागा मिळण्याचा अंदाज आहे. प्राब संस्थेच्या एक्झिट पोलनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचे संकेत आहेत. येथे राष्ट्रवादी (अजित पवार गट) सुमारे 51, भाजप 24 आणि शिवसेना (शिंदे गट) 9 जागा मिळवू शकते. इतर पक्षांना अत्यल्प जागा मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात मिश्र निकालाचे संकेत
जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापुरात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस यांच्यात त्रिकोणी लढत दिसून येऊ शकते. भाजपला 29 ते 32, शिंदे गटाला 18 ते 21, तर काँग्रेसला 19 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उर्वरित पक्षांना मर्यादित प्रतिनिधित्व मिळू शकते.

पुण्यात भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज
पुणे महापालिकेत भाजपला स्पष्ट आघाडी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्राबच्या एक्झिट पोलनुसार भाजपला सुमारे 93 जागा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 43, तर इतर पक्षांना तुलनेने कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.

COMMENTS