मुंबईच्या प्राणवायूत ठाणे, नवी मुंबईची वाटमारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईच्या प्राणवायूत ठाणे, नवी मुंबईची वाटमारी

प्राणवायू पुरवठादार कंपन्यांकडून मुंबई शहरासाठी वितरित झालेला प्राणवायू ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेने परस्पर आपल्याकडील रुग्णांसाठी वळविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

दसर्‍याला चौंडीत धनगर आरक्षणासाठी महामेळावा
अवैध कत्तलखान्यांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
राज ठाकरेंचे विचार ऋतूप्रमाणे बदलतात : गुलाबराव पाटील | LOK News 24

मुंबई / प्रतिनिधी : प्राणवायू पुरवठादार कंपन्यांकडून मुंबई शहरासाठी वितरित झालेला प्राणवायू ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेने परस्पर आपल्याकडील रुग्णांसाठी वळविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या वाटमारीमुळे मुंबईच्या हिश्शाचा तब्बल 114 टन द्रवरूप प्राणवायू पाच दिवसांमध्ये शहरात पोहोचू शकला नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात मुंबईत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.

या प्रकरणी मुंबई महापालिकेने पुरवठादाराला नोटीस बजावली असून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तसेच कोकण विभागीय आयुक्तांसमोर पत्राद्वारे गार्‍हाणे मांडले आहे. गरज आणि रुग्णसंख्येनुसार प्रत्येक शहरासाठी प्राणवायूचा हिस्सा निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईसाठी 234  टन प्राणवायू उपलब्ध करण्यात येतो. गुजरात, अलिबाग आणि अन्य एका अशा तीन ठिकाणच्या उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करण्यात येणारा प्राणवायू सतरामदास गॅसेस कंपनीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला मिळतोे. पालिका हा साठा आपली रुग्णालये आणि जम्बो कोरोना केंद्रांना पुरवते. हीच  कंपनी मुंबईप्रमाणेच ठाणे आणि नवी मुंबईला प्राणवायूचा पुरवठा करते. ठाणे, तसेच नवी मुंबई पालिकांच्या प्राणवायू वाटमारीची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी कंपनीला भेट देऊन पाहणी केली. मुंबईला आपल्या हिश्शाचा पूर्ण प्राणवायू मिळावा, यावर देखरेख करण्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या पथकांची रबाळे येथील सतरामदास गॅसेस कंपनी परिसरात नेमणूक करावी, अशी विनंती महापालिकेने अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त, तसेच कोकण विभागीय आयुक्तांना पत्राद्वारे केली. या प्रकरणी मुंबई महापालिकेने पुरवठादार सतरामदास गॅसेस कंपनीवर नोटीस बजावली असून मुंबईच्या हिश्शाचा अन्य शहरांना दिलेला प्राणवायू त्यांच्या हिश्शातून मिळवून सात दिवसांच्या आत परत करावा, असे या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. नोटीस हातात पडताच कंपनीने मुंबई महापालिकेची माफीही मागितल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. पुरवठादार कंपनीकडे प्राणवायूचा एक टँकर आला होता. तो नवी मुंबई आणि ठाण्यासाठी असल्याचा उल्लेख उत्पादक कंपनीने पाठविलेल्या कागदपत्रांवर होता. त्यामुळे त्यातील गरजेनुसार प्राणवायू नवी मुंबईसाठी घेण्यात आला. उर्वरित प्राणवायू मुंबईसाठी देण्यात आला. त्यानंतर हा टँकर मुंबईसाठी आला होता, असे समजले. याबाबत चौकशी केली असता टंकलेखनाच्या चुकीमुळे नवी मुंबई, ठाण्याचा उल्लेख कागदपत्रांवर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हा एक गोंधळ वगळता मुंबईचा प्राणवायू नवी मुंबईत वापरलेला नाही, असे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले, तर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना लघुसंदेश पाठविण्यात आला; पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 24 ते 28 एप्रिल या काळात मुंबईच्या हिश्शाचा तब्बल 114  टन द्रवरूप प्राणवायू पुरवठादार कंपनीने नवी मुंबई आणि ठाणे शहरांना दिला. सोमवार, 26 एप्रिल रोजी तर मुंबईच्या हिश्शाचा 62 टन द्रवरूप प्राणवायू सतरामदास गॅसेस कंपनीत पोहोचला; मात्र त्यापैकी मुंबईला केवळ 13 टन प्राणवायू मिळाला. या दोन्ही महापालिकांनी आपल्याकडील रुग्णांसाठी प्राणवायूचे टँकर परस्पर वळविल्याची माहिती मुंबई महापालिकेसमोर आली.

COMMENTS