नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणारी रुग्णवाहिका त्यात असलेल्या महिला रुग्णासह पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे घडला.
संगमनेर/प्रतिनिधी- नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणारी रुग्णवाहिका त्यात असलेल्या महिला रुग्णासह पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे घडला. मात्र, या प्रकरणाचा काही तासांतच घारगाव पोलिसांनी तपास लावून संगमनेर येथून ती रुग्णवाहिका आणि आरोपीला ताब्यात घेतले. तसेच या रुग्णवाहिकेतील रुग्णाला उपचारासाठी तातडीने पुण्याला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.
याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, सोमवारी दि. 9 रोजी रुग्णवाहिकेचा (एमएच 15 डीके 6060) चालक योगेश म्हाळू रोंगटे (रा. कवडदरा, नाशिक) एक महिला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना घेऊन नाशिक-पुणे महामार्गावरून पुण्याकडे निघाले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास घारगाव येथे हॉटेल लक्ष्मीसमोर रुग्णवाहिका उभी करून चालक जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेला. त्यावेळी रुग्णाचे नातेवाईकही लघुशंकेसाठी खाली उतरले. ते सर्वजण जेव्हा परत आले, त्यावेळी रुग्णवाहिका जागेवर नव्हती. त्यामुळे रुग्णासह रुग्णवाहिका पळवली गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. घारगाव पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. नाकाबंदी करून या मार्गावरील पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळानंतर संगमनेर शहर पोलिसांना ही रुग्णवाहिका शहरातून जाताना दिसली. त्यांनी ती ताब्यात घेऊन घारगाव पोलिसांना माहिती दिली. घारगावचे पोलीस तातडीने संगमनेरला गेले. त्यांनी रुग्णवाहिका आणि आरोपी वैभव सुभाष पांडे याला ताब्यात घेतले. रुग्णवाहिकेतील महिला सुरक्षित होती. त्यांना उपचाराची गरज असल्याने पोलिसांनी ही रुग्णवाहिका लगेच चालक रोंगटे याच्या ताब्यात दिली. तो रुग्णाला घेऊन पुण्याला रवाना झाला.
त्यानंतर त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पांडे याच्याविरोधात रुग्णवाहिका चोरीचा आणि महिला रुग्णाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत चोरीच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे आढळून आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील तसेच राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे यांनी तातडीने पावले उचलल्याने काही वेळातच रुग्णवाहिकेचा शोध लागला. याशिवाय रुग्णाला पुढील उपचारासाठी तातडीने घेऊन जाता आले. आरोपी सध्या घारगाव पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
COMMENTS