महागाईने जनता, स्वस्ताईने शेतकरी बेजार

Homeसंपादकीय

महागाईने जनता, स्वस्ताईने शेतकरी बेजार

गेल्या आठवड्यात 'मूडीज' या नावाच्या जागतिक पतमापन संस्थेने भारतातील महागाई असह्य झाल्याचा अहवाल दिला होता.

शब्द हेचि कातर
माजी सरन्यायाधीशांचा बाणेदारपणा
मोरबीची दुर्घटना : मानवी जीवन मूल्ये पायदळी !

गेल्या आठवड्यात ‘मूडीज’ या नावाच्या जागतिक पतमापन संस्थेने भारतातील महागाई  असह्य झाल्याचा अहवाल दिला होता. त्याची प्रचिती आता जनता दररोज घेत आहे. त्याच वेळी शेतीमालाला मात्र भाव नाही. गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाले. त्यातच आता टाळेबंदी लागू करण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत आले आहेत. कांदा, द्राक्षे आणि आता टोमॅटोचे भावही उतरत आहेत. दुसरीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. 

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून पडले आहे. तांदूळ, मसूर, पीठ, मोहरीचे तेल, खाद्यतेल किंमत किंवा चहा आणि मीठाचे भाव एका वर्षात इतके वाढले आहेत, की स्वयंपाकघरचे बजेट पुरते कोलमडून पडले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, एक एप्रिल 2020 पर्यंत खाद्य तेलाच्या किंमती 47 टक्क्यांनी, डाळींच्या किंमती 17 टक्क्यांनी आणि खुल्या चहाच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, भात दर 14.65 टक्के, गव्हाचे पीठ 3.26 टक्क्यांनी वाढले आहेत. अशात साखर स्वस्त झाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून साखरेचे भाव कमीच आहेत. साखर हा शेतीशी निगडीत विषय आहे. त्यामुळे शेतक-यांनाच उसाला कमी भाव मिळतो. अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या, तर शेतक-यांना जादा पैसे मिळत नाहीत आणि साखरेसारख्या वस्तूच्या भावाचा फटका शेतक-यांना बसतो आहे. खाद्यतेलांच्या किंमती गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पॅक पाम तेलाची किंमत 87 रुपयांवरून 121 रुपयांवर, सूर्यफूल तेल 106 ते 157, भाजीपाला तेल 88 ते 121 आणि मोहरीचे तेल (पॅक) प्रतिलिटर 117 ते 151 रुपयांवर पोहोचले आहे. तिथेच शेंगदाणे 139 ते 165 आणि सोया तेल 99 ते 133 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. खाद्य तेलाव्यतिरिक्त चहा आणि दुधाच्या किंमतीही वाढल्या आहेत. एका वर्षात ओपन चहा 217 ते 281 किलोपर्यंत पोहोचला आहे. चहाच्या दरात एकूण 29 टक्के वाढ झाली आहे. या एका वर्षात मीठाच्या भावातही दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी दूध सात टक्क्यांनी महाग झाले आहे. ग्राहक मंत्रालयाला दिलेली ही आकडेवारी देशभरातील 135 खुदरों केंद्रांपैकी 111 केंद्रांकडून गोळा केली गेली आहे. ताज्या आकडेवारीनुसार तूर डाळींचे डाळ 91 रुपये ते 106 रुपये, उडीद डाळ 99 ते 109 रुपये, मसूर डाळ 68 ते 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहे. मूग डाळही 103 ते 105 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट, घसरलेले भाव आणि अळी, किटकांचा प्रादुर्भाव या सर्व गोष्टींमुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पुण्यातील इंदापुरातील शेतकऱ्यांची परिस्थिती तर अधिक चिंताजनक आहे. गेल्या चार महिन्यांत चांगले दर मिळालेल्या टोमॅटोचा भाव कोरोना आणि टाळेबंदीच्या भीतीने चांगलाच कोसळला आहे. व्यापारी कवडीमोल दराने टोमॅटोची खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच माशी आणि अळीचाही पिकावर मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याच कारणांमुळे इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील एका शेतकऱ्याने उद्विग्न होऊन दीड एकरातील टोमॅटोचे पीक काढून टाकले आहे. सध्या एक ते पाच रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता कोरोनाची दुसरी लाटसुद्धा शेतकऱ्यांसाठी तितकीच दाहक ठरत आहे. टाळेबंदी आणि कोरोनाच्या भीतीमुळे फळभाज्या तसेच इतर पिकांचे भाव गडगडले आहेत. पुण्यातील इंदापुरातील शेतकरीसुद्धा यामुळे त्रस्त आहेत. मागील चार ते पाच महिन्यांत टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता. या काळात शेतकऱ्यांना चांगली नफा झाला; मात्र टाळेबंदी कोरोना या संकटानंतर आता येथे माशी आणि अळ्यांनी टोमॅटो पिकावर हल्ला सुरु केला आहे. इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव या गावातील शेतकरी महादेव खबाले यांनी लावलेल्या टोमॅटो या पिकाला अळ्या आणि माशांचा चांगलाच फटका बसला आहे. पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाल्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन आपल्या दीड एकर शेतातील टोमॅटोची सर्व झाडे चक्क तोडून फेकून दिली आहेत. टोमॅटो लावल्यानंतर मोठे कष्ट घेतले. औषध फवारणी, खत, पाणी असा मोठा खर्चसुद्धा त्यांनी केला; मात्र ऐनवेळी टाळेबंदी, कोरोनामुळे टोमॅटोचे भाव घसरले. त्याबरोबरच माशा आणि अळी यांच्या हल्ल्यामुळे टोमॅटोचे पीकसुद्दा नष्ट झाले. माशा आणि अळ्यांचा पिकावरील हल्ला आटोक्यात आला नाही. त्यामुळे सर्व पिकाची नासधूस झाली. याच कारणामुळे शेतातील टोमॅटो काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संसर्गामुळे बाजारपेठेवर झालेले परिणाम, तसेच अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडल्याचे बोलले जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात टाळेबंदी केली जात असल्याने जात असल्यामुळे जनतेच्या मनामध्ये धाकधूक वाढली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तर राज्यात पुन्हा एकदा टाळेबंदी लागू होण्याची शक्यता वाढल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच अनेकांच्या नोकऱ्या टाळेबंदीमुळे गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नको असल्याच्या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.

COMMENTS