प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लक्ष्यअहमदनगर/प्रतिनिधी-यापुढे आपण कोणाशीही युती वा आघाडी करणार नाही. त्यामुळे यापुढे भाजप
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लक्ष्य
अहमदनगर/प्रतिनिधी-यापुढे आपण कोणाशीही युती वा आघाडी करणार नाही. त्यामुळे यापुढे भाजप स्वबळावर लढणार आहे. नगर शहरात भाजपचा आमदार करायचा असून, जिल्ह्यातील बाराही जागांवर पक्षाचे आमदार होण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच संघटनात्मक बांधणी गांभीर्याने करावी, अशा स्पष्ट सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे दिल्या.
पक्षाची बुथ रचना तसेच संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील नगरला आले होते. येथील सारडा महाविद्यालयात त्यांनी नगर शहर, नगर उत्तर व नगर दक्षिण असा पूर्ण जिल्ह्याचा आढावा टप्प्याटप्प्याने घेतला. आ. मोनिका राजळे, माजी आमदार प्रा. राम शिंदे, वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, शिवाजी कर्डिले, नगरचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पदाधिकार्यांची झाडाझड़ती
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रत्येक पदाधिकार्याला उभे करून त्याच्याकडे असलेल्या पदाव्यतिरिक्तची संघटनात्मक जबाबदारी विचारली. अनेकांना आपल्या वॉर्डातील बुथ संख्याही सांगता आली नाही, आपल्याशी संबंधित काही हक्काच्या मतदारांची नावेही सांगता आली नाही. त्यामुळे पाटील यांनी सर्वांची झाडाझडती घेतली. नगर शहरात संघटनात्मक काम 8 दिवसात प्रभावी झाले नाही तर शहराध्यक्ष बदलण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. पक्षाच्या 50 पदाधिकार्यांनी प्रत्येकी 500 मतदारांशी नियमित संपर्क ठेवला तर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद वाढू शकते, असे सांगून ते म्हणाले, यापुढे कोणाशीही आपली युती व आघाडी होणार नाही, असे गृहित धरून प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. पण स्वबळावर लढताना उमेदवारी आपणच करणार, असा हेतू ठेवून कोणीही काम करू नये. उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. त्यामुळे फक्त संघटनात्मक बांधणीवरच सर्वांनी गांभीर्याने लक्ष केंद्रीत करावे, असेही त्यांनी सूचक शब्दात काही नेत्यांची नावे घेत स्पष्ट केले.
राज्य सरकार कोठे आहे?
कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पूर स्थिती असताना राज्य सरकारमधील सर्वजण कोठे आहेत, असा सवाल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. अनेक भागात पूरस्थिती असताना सरकारकडून मदतीचा हात दिला जात नाही व मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण परिसरात पुराच्या पाण्याने गावे वेढली आहेत. पुरामध्ये राजकारण करायला नको, असे म्हणून हातामध्ये हात घालून मदत करायची भाषा बोलली जाते, पण मदत करायला सरकारमधील कोणाचेही हात पुढे आल्याचे दिसत नाहीत. निसर्ग वादळ, अतिवृष्टी, तोक्त वादळात जाहीर झालेली मदत अजून पोहचली नाही, तरी सांगता की मदत मिळेल?, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज होते. पण, कार्यकर्त्यांना समजवले असल्याने आता कोणीही नाराज नाही, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
COMMENTS