कोरोना रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा करा, रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून द्या, रुग्णांना बेडसुध्दा उपलब्ध करून द्या.
अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोना रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा करा, रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून द्या, रुग्णांना बेडसुध्दा उपलब्ध करून द्या.. यासह विविध मागण्यांसाठी नगर शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
नगर शहरामध्ये अनेक रुग्णांना बेड मिळू शकत नाही तसेच रेमडीसिवीरसह अन्य इंजेक्शनचा साठा संपल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पळापळ करावी लागते. प्रशासनाने मोबाईल नंबर दिले असले तरी ते नंबरच लागत नाही आणि रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध न झाल्यामुळे नातेवाईकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. तीन दिवसांपूर्वी कँडल मार्च आंदोलन केले. मात्र, तरीही प्रशासनाला जाग आली नाही, त्यामुळे आता आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयास समोर स्वयंसेवी महासंघाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे व जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा निर्धार डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला. महासंघाच्या स्वयंसेवकांनी निषेधाचे फलक फडकावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. जोरदार घोषणाबाजी यावेळी देण्यात आली व प्रशासनाच्या कारभाराचा धिक्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, आज नगर जिल्ह्यामध्ये रुग्णांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. वेळेवर कोणतीही वैद्यकीय सुविधा मिळत नाही. प्रशासन गांभीर्याने दखल घ्यायला तयार नाही. तीन दिवसांपूर्वी आम्ही निवेदन दिले होते, त्यावेळी आम्हाला जे आश्वासन दिले होते, त्याची अंमलबजावणी कुठेही झालेली नाही, असे दिसून आले आहे. नगर शहरामध्ये अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आता संपत आलेला आहे. त्यामुळे त्या रुग्णांना इतरत्र हलवण्याची धावपळही नातेवाईकांची सुरू झालेली आहे जर ऑक्सिजन वेळवर मिळाला नाही तर अनेक रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. एवढे असताना देखील प्रशासन या गोष्टी गांभीर्याने का घेत नाही, ते रुग्णांची का हेडसळ करतात? असा सवालही कुलकर्णी यांनी यावेळी केला. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे अॅड. श्याम असावा म्हणाले, नगर शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कुठेही इंजेक्शनचा साठा उपलब्ध नाही. अजूनही रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येक ठिकाणी इंजेक्शनचा शोध घेण्यासाठी फिरावे लागत आहे. जे मोबाईल नंबर प्रशासनाने जाहीर केले आहेत, तेथे कधीच योग्य उत्तरे दिली जात नाही व यातील अनेक अधिकार्यांचे फोन बंद असतात. हीसुद्धा गंभीर बाब आहे. आज नगर जिल्ह्यामध्ये दोन हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. नगर शहरामध्ये आजच्या दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा आहे. एवढी बिकट परिस्थिती असतानादेखील प्रशासनाने आंदोलनाची कोणतीच दखल घेतली नाही तर याला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
COMMENTS