बालरोगतज्ज्ञांचा कृती गट

Homeसंपादकीय

बालरोगतज्ज्ञांचा कृती गट

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना फार त्रास झाला नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मात्र लहान मुलांचे जीवित धोक्यात आले आहे.

राफेलचं भूत पुन्हा मोदींच्या मानगुटीवर
महिलांचा सन्मान, मात्र सुरक्षेचे काय ?
…तर, ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतील!

 कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना फार त्रास झाला नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मात्र लहान मुलांचे जीवित धोक्यात आले आहे. आता दोन दिवसांच्या बाळांचाही कोरोनाने बळी घेतला आहे. महाराष्ट्रासह देशात आढळत असलेला म्युटेंट धोकादायक आहे. दुसरी लाट आता शिखरावर असताना वैज्ञानिकांनी तिसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे. 18 वर्षे वयोगटाच्या पुढच्या नागरिकांसाठी कोरोनाच्या वेगवेगळ्या लसी असल्या, तरी 18 वर्षांच्या आतील मुलांसाठी कोरोनाची लस अजून उपलब्ध झालेली नाही. ती केव्हा उपलब्ध होईल, याची खात्री नाही. त्यामुळे 18 वर्षांच्या आतील मुलांना जपणे हे मोठे आव्हान आहे.  

    या वयोगटातील सुमारे दोन लाख मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पुढचा काळ हा या वयोगटासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक, दुसर्‍या लाटेत युवावर्ग आणि तिसर्‍या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग जास्त पसरू शकतो, अशी सूचना तज्ज्ञांनी सरकारला केली होती. ही परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने आतापासूनच काळजी घ्यायला सुरुवात केली, हे चांगले झाले. तिसरी लाट अजून तीन महिन्यांनी येऊ शकते. त्यामुळे आताच राज्यात बालरोगतज्ज्ञांचा एक कृती गट स्थापन करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला असून त्याचे स्वागत करायला हवे. ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा पुरेशी अगोदर दक्षता घेतलेली केव्हाही चांगले. तिसरी लाट लक्षात घेता लहान मुलांची काळजी आणि उपचार यावर कृतीदल मार्गदर्शन करेल. 18 च्या आतील वयोगटासाठी रुग्णालयातील बेड्स वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लहान मुलांसाठी एनआयसीयू, व्हेंटिलेटर्सची सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. अन्य वयोगटात कोरोना संसर्गामुळे तसेच लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती तयार झाली आहे; परंतु मुलांच्या बाबतीत तसे नाही. मुलांमध्ये संसर्ग जास्त नसल्याने त्यांना जास्त धोका आहे, असे तज्ज्ञ सांगतात. लहान मुलांना तिसर्‍या लाटेत संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने कोव्हिड रुग्णालयात लहान मुलांसाठी खास व्यवस्था करण्याची सूचना दिली आहे. अगोदरच खाटांची कमतरता, प्राणवायूचा अपुरा पुरवठा या संकटांशी लढत असताना आता मुलांसाठी वेगळी व्यवस्था करण्याची वेळ आली आहे. म्युटेट झालेला कोरोना व्हायरस रोगप्रतिकार शक्तीला चकवणारा असल्याने लहान मुलांनाही याची लागण होत आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती परिणाम होईल, याबाबत वैज्ञानिकांत मतभेद आहेत. त्यांच्याच एकवाक्यता नाही. असे असले, तरी राज्य सरकारला सजग राहावे लागेल. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने सांगतात, की पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिक आणि दुसर्‍या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचे वय 20 वर्षापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे; पण हा फक्त अंदाज आहे. असे होईलच हे निश्‍चित नाही. त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. लहान मुलांमध्ये कोरोनासंसर्ग सौम्य स्वरूपाचा दिसून येतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत फार कमी लहान मुलांना संसर्ग झाला होता. दुसर्‍या लाटेत याचे प्रमाण जास्त आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि मध्यम वयोगटातील लोकांना लागण झाली. त्यामुळे त्यांच्या शरीरात प्रतिपिंडे तयार झाली आहेत. त्यांना आजार होणार नाही किंवा झाला तरी सौम्य स्वरूपाचा असेल; पण लहान मुलांना आजाराचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला नाही.  पहिल्या लाटेत फार कमी लहान मुलांना संसर्ग झाला. दुसर्‍या लाटेत संख्या तुलनेने वाढली; पण अजूनही कोट्यवधी मुले आहेत, ज्यांना संसर्ग झाला नाही, त्यांना लागण होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तज्ज्ञ म्हणतात, लहान मुलांना तिसर्‍या लाटेत संसर्ग होण्याची हीच शास्त्रीय आणि तार्किक कारणे असू शकतात. तज्ज्ञ सांगतात, की महाराष्ट्रात आढळून आलेला डबल म्युटंट तीव्रतेने पसरणारा आणि अधिक संसर्ग क्षमतेचा आहे. त्यामुळे मुलांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. काही तज्ज्ञांच्या  पुढच्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होईल किंवा त्यांना धोका आहे याचे काहीच ठोस वैद्यकीय कारण नाही. येत्या काळात कोरोना विषाणूत काय बदल होतील, आपल्याला सांगता येणार नाही. मुलांचा इतरांशी येणारा संपर्क, अधिक संसर्ग क्षमतेचा व्हायरस यामुळे मुलांमध्ये लक्षणे दिसून येत आहेत. राज्यात एक मार्च ते 19 एप्रिलदरम्यान दहा वर्षापर्यंतची 43 हजार 201 मुले कोरोनाबाधित आली. दहा ते वीस वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कोरोनासंसर्गाच्या केसेस एक लाख 11 हजारांनी वाढल्या. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभ्याव्य तिसर्‍या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानला तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालयात लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. अतिदक्षता विभाग, व्हॅन्टिलेटर, वार्ड, कोव्हिड सेंटरमध्ये बेड्स तयार केले जातील, याची तयारी करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाची येणारी लाट लक्षात घेता मुंबईत लहान मुलांचे कोव्हिड केअर वॉर्ड तयार करण्याचे सुचवले आहे. ज्या मुलांचे पालक कोव्हिडने आजारी आहेत अशा मुलांसाठी पाळणाघर सुरू करावी लागतील. तिसर्‍या लाटेतील लहान मुलांच्या कोरोनाचे आव्हान पेलण्यासाठी राज्य सरकारने तयार राहायला हवे.

COMMENTS