बाधिताचा मृत्यू… सिव्हीलमध्ये नातेवाइकांकडून तोडफोड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाधिताचा मृत्यू… सिव्हीलमध्ये नातेवाइकांकडून तोडफोड

येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात (सिव्हील) उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी तोडफोड केली.

मोटारसायकलवरील मधल्याने महिलेचे गंठण धूमस्टाईलने पळविले
शिर्डीत रेड अलर्ट ! दहशतवादी कारवाईचा धोका.
बाजार समित्यांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड उतरणार

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात (सिव्हील) उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी तोडफोड केली. अतिदक्षता विभागाच्या काचा फोडण्यात आल्या. योग्य उपचार न झाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सर्वांना बाहेर काढले. 

नगर तालुक्यातील वाकडी या गावातील एका कोरोनाबाधित रूग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला व खूप गोंधळ घातला. यातील एकाने अतिदक्षता विभागाच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. तोफखाना पोलीस जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तोडफोडीचा पंचनामा त्यांनी केला. संंबंधित डॉक्टरांनी तक्रार दिली तर गुन्हा दाखल करण्याचीही तयारी पोलिसांनी दाखवली. पण सायंकाळपर्यंत तोफख़ाना पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

यंत्रणेवर आला ताण

आतापर्यंत उपचार होत नसल्याबद्दल तक्रारी केल्या जात होत्या. ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले होते; मात्र आता थेट तोडफोडीची घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोना ग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांच्या भावना संतप्त होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. पण बाधितांची संख्या वाढत असल्याने तसेच सध्या सुमारे 19 हजार रुग्णांवर उपचार सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. जिल्हा रुग्णालयात कर्मचारी संख्याही कमी आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आरोग्य विभागात भरती प्रक्रिया राबवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये सांगितले. पण ही प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष भरती कधी होणार व जिल्हा रुग्णालयास नवे कर्मचारी कधी मिळणार, हा प्रश्‍नच आहे. दरम्यान, कोरोना बाधिताला त्रास होऊ लागल्यानंतर त्याच्या नातेवाईकांची बेड मिळवण्यासाठी होणारी धावाधाव त्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शन साठी वणवण व त्यातूनच ऑक्सिजनचा तुटवडा अशा स्थितीत रुग्ण दगावला तर नातेवाईकांची होणारी विमनस्क अवस्था आणि घडणारे तोडफोडीसारखे प्रकार यातून नातेवाईकांचे भावनिक संतुलन सुटत चालल्याचे दिसू लागले आहे. यापूर्वीही  एका बधिताला अनेक रुग्णालये फिरून आल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच अखेरचा श्‍वास घ्यावा लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासनाने रुग्णांना तातडीने बेड मिळावा, औषधे-इंजेक्शन्स उपलब्ध व्हावीत व मुबलक ऑक्सिजन मिळावे यासाठी दक्ष राहणे गरजेचे झाले आहे.

गुन्हा दाखलची प्रतीक्षा

जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी केलेल्या तोडफोडीच्या घटनेची माहिती देणार्‍या पोस्ट व्हॉटसअ‍ॅप व फेसबुकसारख्या सोशल मिडियावरून व्हायरल झाल्याने या घटनेची दिवसभर नगरमध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे याबाबत तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असताना तोडफोडीची ती घटना मोठी नाही, रागाच्या भरात एका नातेवाईकाने अतिदक्षता विभागाच्या काचेवर बुक्की मारल्याने एक काच तुटली आहे. बाकी मारहाण वा दगडफेकसारखे काहीही घडलेले नाही. पण पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. जिल्हा रुग्णालयातील संबंंधितांनी तक्रार दिली तर आम्ही गुन्हा दाखल करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS