पोलिसांचे संचलन देऊन गेले चर्चांना उधाण ; अनलॉकच्या पार्श्‍वभूमीवर दक्षतेच्यादृष्टीने पोलिसांची  लेफ्ट-राईट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांचे संचलन देऊन गेले चर्चांना उधाण ; अनलॉकच्या पार्श्‍वभूमीवर दक्षतेच्यादृष्टीने पोलिसांची लेफ्ट-राईट

अनलॉकचा आनंद घेत सारे नगरकर सोमवारी सायंकाळी काहीना काही कामानिमित्त गावात फिरत असताना अचानक पोलिसांचा जथ्था नजरेस पडला आणि नागरिकांच्या पोटात धस्स झाले.

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राबवली स्वच्छता मोहीम
श्रीपाद छिंदमच्या विरोधात होणार दोषारोपपत्र दाखल l LokNews24
शासनाच्या पेन्शन समिती आदेशाची केली होळी…

अहमदनगर/प्रतिनिधी-अनलॉकचा आनंद घेत सारे नगरकर सोमवारी सायंकाळी काहीना काही कामानिमित्त गावात फिरत असताना अचानक पोलिसांचा जथ्था नजरेस पडला आणि नागरिकांच्या पोटात धस्स झाले. नगर शहरामध्ये नेमके काय झाले, कुठे व काय झाले याची चर्चा लगेच सगळीकडे पसरली. पण नंतर पोलिसांचे प्रात्यक्षिक सुरू असून, अनलॉकच्या वातावरणात दक्षता तसेच एखादी दुर्घटना घडली तर पोलिस तेथे वेळेवर पोहोचावेत, याचा सराव यानिमित्ताने सुरू असल्याचे नागरिकांना समजले आणि नंतर नागरिकांनीही रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून पोलिसांची ही लेफ्ट-राईट अनुभवली.

    जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये जर काही घटना घडली, तर पोलिस खाते घटनास्थळी किती वेळामध्ये दाखल होते, हे पाहण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाचा एक डेमो म्हणजेच प्रात्यक्षिक सोमवारी सायंकाळी घेण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. एखादी घटना घडल्यानंतर पोलिस किती वेळामध्ये पोहोचतात याचा आढावा नेहमी घेतला जातो. त्यासाठी वेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिके सातत्याने होत असतात. सोमवारी सायंकाळी नगर शहरामध्ये तेलीखुंट भागामध्ये अशा प्रकारचे एक प्रात्यक्षिक पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले. नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर ही अंमलबजावणी करण्यात आली.

अनलॉक दक्षतेचा हेतू

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यातच एखादा आपत्तीचा प्रसंग घडला, तर पोलिस प्रशासनाने सुद्धा दक्ष राहिले पाहिजे. या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये नगर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासह तोफखाना पोलिस, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या पथकाने तसेच कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देशमुख यांची पथके यात सहभागी झाली होती. नगर जिल्ह्यामध्ये दंगल नियंत्रण पथक, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स यासह विविध प्रकारचे पोलिसांचे पथक या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते. तसेच रुग्णवाहिका, महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथकसुद्धा यामध्ये होते.

खरे कळले व सुटकेचा निःश्‍वास

सायंकाळी पाचच्या सुमाराला तेलीखुंट येथे अचानकपणे चारही बाजूंनी पोलिस एकाच ठिकाणी आले व त्यांनी तेथील भागांमध्ये संचलन सुरू केले. याच परिसरात नगर जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ कापड बाजार, आडते बाजार, घासगल्ली, गंजबाजार असल्यामुळे सायंकाळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नेमक्या याच वेळेला पोलिसांचे संचलन सुरू झाले आणि नगर शहरामध्ये काय झाले, पोलिस का जमा झाले? याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली. अखेरीस हा प्रात्यक्षिकाचा व एक प्रकारचा सराव होता, हे कळल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

COMMENTS