बारामती/प्रतिनिधीः बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावातील शेतकर्यांच्या जमिनी जात असल्याने नव्याने होणार्या नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
बारामती/प्रतिनिधीः बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावातील शेतकर्यांच्या जमिनी जात असल्याने नव्याने होणार्या नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यासंदर्भातील निवेदन प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
यापूर्वी पुरंदरमध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची नियोजित जागा बदलून बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी आणि आंबी खुर्द आदी गावांचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे; मात्र हा प्रयत्न बारामती तालुक्यातील गावे हाणून पाडतील, असा इशारा या परिसरातील शेतकर्यांनी दिला आहे. विमानतळासाठी गावातील जमिनी घेण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही सर्वेक्षण झालेले नाही. तसेच प्रशासनाकडून आम्हाला तशी कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. याठिकाणी मागील सहा वर्षापासून जनाई उपसा योजनेचे पाणी येत असल्याने येथील बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. तसेच चांदगुडेवाडी गावाच्या दक्षिण बाजूने कर्हा नदी वाहत आहे. त्यामुळे चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावातील संपूर्ण क्षेत्र हे बागायत स्वरूपाचे झाले आहे. या परिसरात ऊस, कांदा, गहू, टोमॅटो इत्यादी नगदी स्वरूपाची पिके घेण्यात येत आहेत. डाळिंब, पेरू, सीताफळ इत्यादी फळबागा आहेत. तसेच या गावामध्ये 25 ते 30 शेततळी शेतकर्यांनी तयार केलेली आहेत. त्यामुळे येथील शेतकर्यांनी माळरान जमिनीसुद्धा मोठ्या कष्टाने बागायती केलेल्या आहेत. या गावातील बहुतांश शेतकर्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. तसेच चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावामध्ये शेतीबरोबर पशुपालन व पोल्ट्री व्यवसायदेखील मोठया प्रमाणात असून त्यामधून शेतकर्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळत आहे. प्रांताधिकारी व तहसीलदारांना ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात हे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे या तिन्ही गावांनी एकत्र बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळास तीव्र विरोध दर्शविला आहे.
COMMENTS