अकोले : मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्त्यांसाठी शासनाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला असतानाच, शेतशिवारातील पानंद रस्ते खुले करण्याची प्रशासकीय

अकोले : मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्त्यांसाठी शासनाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला असतानाच, शेतशिवारातील पानंद रस्ते खुले करण्याची प्रशासकीय प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अकोले तालुक्यातील गंभीरेवाडी (पैठण) येथे एका तथाकथित जागामालकाच्या खोडसाळपणामुळे तब्बल पाच पिढ्यांचा पानंद रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उखडून टाकण्यात आल्याने संपूर्ण गावाचा संपर्कच तुटला आहे.
दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी गंभीरेवाडी (पैठण) येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता संबंधित व्यक्तीने जेसीबीने खोदून टाकला. त्यामुळे पैठण तसेच राजूर-कोतुळकडे जाणारा मुख्य मार्ग बंद झाला आहे. हा रस्ता अनेक वर्षांपासून वापरात असून गावासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो.
या ठिकाणी गेल्या २० वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे (इयत्ता १ ली ते ६ वी) वर्ग भरत आहेत. मात्र, रस्ता खोदल्यामुळे विद्यार्थ्यांचे ये-जा करणे धोकादायक बनले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची शेतीची कामे ठप्प झाली असून गुरेढोरे, बैल, ट्रॅक्टर तसेच लहान वाहनेही जाणे अशक्य झाले आहे. परिणामी शेती करणे अवघड होऊन बसले आहे.
या रस्त्यामुळे भविष्यात अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व संबंधित व जबाबदार अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाचा तातडीने, युद्धपातळीवर पाठपुरावा करून रस्ता पूर्ववत करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी नामदेव गंभिरे (अध्यक्ष, आदिवासी समाज कृती समिती, महाराष्ट्र, पुणे) यांच्यासह लक्ष्मण गंभिरे, मारुती गंभिरे, भीमाजी गंभिरे, सखाराम गंभिरे, अनिल गंभिरे, सुनील गंभिरे, भाऊसाहेब गंभिरे, दत्तात्रय गंभिरे, सुरेश गंभिरे, सोमनाथ गंभिरे, तुकाराम गंभिरे, निवृत्ती गंभिरे, नानासाहेब गंभिरे, संजय गंभिरे, विकास गंभिरे, स्वप्नील गंभिरे, विठ्ठल गंभिरे, सुभाष गंभिरे, सीताबाई गंभिरे, शेवंताबाई गंभिरे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS