पाडव्याच्या खरेदीला उसळळी गर्दी ; कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाडव्याच्या खरेदीला उसळळी गर्दी ; कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली

नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केल्या जाणार्‍या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी पुण्यातील मंडईत प्रचंड गर्दी झाली होती.

अखेर ठरलं… ‘या’ तारखेला शाळा उघडणार… राज्य सरकारचा निर्णय
पतंजलीची सोन पापडी गुणवत्तेत नापास
सोनिया गांधींना श्वसनमार्गामध्ये बुरशीजन्य संसर्गाची लागण

पुणे/प्रतिनिधी: नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केल्या जाणार्‍या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी पुण्यातील मंडईत प्रचंड गर्दी झाली होती. त्याठिकाणी अनेक नागरिकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले असून सर्वत्र सामाजिक अंतर भानाचा फज्जा उडवला आहे. अनेक जण तर मुखपट्टीविना  फिरत असल्याचे चित्र होते. 

दोन दिवसांच्या कडक टाळेबंदीनंतर संपूर्ण शहरातून नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यातून गुढीपाडवा एक दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मंडईसारख्या अनेक ठिकाणी पाडव्याचे साहित्य घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. पुण्यातील मध्यवर्ती भागात असणार्‍या मंडईत अनेक सणांच्या वेळी गर्दी होत असते. नागरिक याठिकाणी  उपनगरातूनही खरेदीसाठी येत असतात. मंडईच्या खरेदीबरोबरच आजूबाजूला मिठाईची दुकाने असल्याने गर्दीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. हा सर्व भाग रहदारीचा असल्याने नागरिकांच्या गर्दीला नियंत्रणात आणणे पोलिसांसमोरील आव्हानच झाले आहे. पुण्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे; पण गर्दी करणार्‍या नागरिकांना त्याचे अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे आजूबाजूच्या परिसराततही वाहतूककोंडी झाली आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सहा वाजल्यानंतर संचारबंदी असल्याने नागरिकांनी दिवसा गर्दी केली आहे. अशा परिस्थितीत विक्रेते आणि नागरिक मुखपट्टी फक्त नावालाच जवळ ठेवत आहेत. अनेकांच्या मुखपट्या नाकावरून घसरून गळ्याजवळ आल्या होत्या. गर्दीमध्ये नागरिक शुद्ध हरपल्यासारखे वागू लागले आहेत. काल दिवसभरात सहा  हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसागणिक ही संख्या वाढतच चालली आहे. राज्य सरकार टाळेबंदी लागू करण्याबाबत चर्चा करीत आहे. कधीही टाळेबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत गर्दी करून नागरिक स्वतःबरोबर दुसर्‍यांचा जीवही धोक्यात घालत आहेत.  

COMMENTS