पाचशेवर कामगारांची झाली एचआयव्ही तपासणी; अमृतदीप प्रकल्पात स्थलांतरीतांना आरोग्य मार्गदर्शन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाचशेवर कामगारांची झाली एचआयव्ही तपासणी; अमृतदीप प्रकल्पात स्थलांतरीतांना आरोग्य मार्गदर्शन

नगर शहर व जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या पाचशेवर स्थलांतरीत कामगारांची एचआयव्ही-एडस तपासणी येथील अमृतदीप प्रकल्पाद्वारे करण्यात आली.

भागवतराव शिंदे यांचे निधन
शिवशंकर विद्यालय रवंदे येथे बालचित्रकला स्पर्धा उत्साहात
एकविराच्या महिलांना उदबत्ती व धूप बनवण्याचे प्रशिक्षण

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहर व जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या पाचशेवर स्थलांतरीत कामगारांची एचआयव्ही-एडस तपासणी येथील अमृतदीप प्रकल्पाद्वारे करण्यात आली. या कामगारांसह आणखी साडेचारशेवर कामगारांना स्वआरोग्य जपण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

स्थलांतरित कामगारांमध्ये विविध उपक्रमाद्वारे एडस् व गुप्तरोगाबद्दल जनजागृती अभियान राबवताना त्यांची आरोग्य तपासणी करुन समुपदेशन करण्यात आले. अमृतदीप प्रकल्पाचा स्थलांतरीत कामगारांसाठीचा हा उपक्रम नुकताच झाला. जिल्ह्यातील नगर, सुपा, पांढरीपुल येथील औद्योगिक परिसर, शहरातील हॉटेल, बांधकाम यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार कार्यरत आहेत. कंपनी, हॉटेल, वीटभट्टी, खडी क्रशर, बांधकाम कामगार, फेरीवाले, ऊस तोड कामगार या स्थलांतरीत कामगारांमध्ये एचआयव्ही एडस् व गुप्तरोगाबद्दल जनजागृती करुन त्यांची तपासणी करण्यात आली. मुंबईच्या महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्थेच्या सहकार्याने श्रीअमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अमृतदीप प्रकल्पच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एडस् नियंत्रण कक्षाच्या मदतीने अमृतदीप प्रकल्पाने 15 ते 25 मार्च या कालावधीत 540 स्थलांतरित कामगारांमध्ये गुप्तरोग, एचआयव्ही एडस आजाराबाबत पथनाट्यातून जनजागृती केली. त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिरातून 333 कामगारांची गुप्तरोग तर 278 कामगारांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. 465 कामगारांची इतर आजारांची तपासणी करुन त्यांना हे आजार टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती अमृतदीप प्रकल्पाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिली. उपस्थित सर्व कामगारांचे समुपदेशन करण्यात करण्यात आले. समुपदेशन सत्रादरम्यान असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्ही बाधीत रुग्णास इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई दुसर्‍यांना वापरल्याने, एचआयव्हीबाधीत व्यक्तीचे रक्त दुसर्‍या रुग्णाला दिल्याने, एचआयव्हीग्रस्त गरोदर महिलेपासून तिच्या होणार्‍या बाळाला (नाळेमार्फत), स्तनपानद्वारे आदी कारणांमुळे एचआयव्हीचा प्रसार होऊ शकतो. एचआयव्हीचा विषाणू सहजरित्या शरीराबाहेर हवेत जास्तकाळ जगू शकत नाही. एचआयव्ही बाधीत व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसल्याने, जेवल्याने, राहिल्याने, डास चावल्याने याचा प्रसार होत नसल्याची माहिती प्रकल्पाच्या समुपदेशक पल्लवी हिवाळे-तुपे यांनी उपस्थित कामगारांना दिली. पोस्टर प्रदर्शन, आरोग्य सत्रांच्या माध्यामातून क्षेत्रीय अधिकारी विकास बर्डे, अनिल दुधवडे, ऋतिक बर्डे, मच्छिंद्र दुधवडे यांनी स्थलांतरीत कामगारांमधे जागृती निर्माण केली. आरोग्य तपासणी शिबिरास उपस्थित सर्व कामगारांना मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. 

COMMENTS