रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने ते सुरू करण्यासाठी नगरसेवकांसह मनपाच्या अधिकारी व कर्मचार्यांकडे पाठपुरावा करूनही ते सुरू होत नसल्याने अखेर सामान्य नागरिकानेच पुढाकार घेऊन पथदिव्यांची फ्युज दुरुस्ती करून ते सुरू केले.
अहमदनगर : रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने ते सुरू करण्यासाठी नगरसेवकांसह मनपाच्या अधिकारी व कर्मचार्यांकडे पाठपुरावा करूनही ते सुरू होत नसल्याने अखेर सामान्य नागरिकानेच पुढाकार घेऊन पथदिव्यांची फ्युज दुरुस्ती करून ते सुरू केले. येथील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी स्वतः ही कामगिरी केली. दरम्यान, मनपाकडे विद्युत दुरुस्ती साहित्य नसल्याने जागरूक नागरिक मंचाद्वारे मनपासाठी भिख मांगो आंदोलन करून विद्युत साहित्य जमा करून ते मनपाला दिले जाणार असल्याचे मुळे यांनी सांगितले.
याबाबत सुहासभाई मुळे यांनी दिलेली माहिती अशी की, स्टेशन रोड-आगरकर मळामध्ये रोजच फ्युज बॉक्समध्ये फ्युजऐवजी फक्त भंगार तारा टाकल्यामुळे त्या वितळून शॉर्टसर्किट होऊन रस्त्यावरची लाईट रोजच गायब होत आहे. परंतु अनेक आजी-माजी नगरसेवक व पुढार्यांचे व अधिकार्यांचेदेखील रहिवासी क्षेत्र असलेल्या या आगरकर मळ्यातील कोणालाही त्याचे काहीही देणे-घेणे नाही. त्याच अंधार्या रस्त्यांवरून ते ये जा करत असतात. मात्र, रस्त्यांवरील अंधारामुळे चोरांचा उपद्रव वाढला आहे. मनपा अधिकारी व कर्मचार्यांनाही पथदिवे दुुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. पण त्यांच्याकडून दखल घेतली गेली नाही, असे मुळे यांचे म्हणणे आहे.
हाती घेतली पक्कड व तार
स्टेशन रस्ता परिसरातील पथदिवे बंद असल्याने सोमवारी रात्री अकरा वाजता स्वतः सुहासभाई मुळे यांनी जीव धोक्यात घालून धोकादायक उघड्या फ्युज बॉक्समध्ये फ्यूज तार बसवून रस्त्यावरचे लाईट चालू केले. त्यांनी स्वतः हातात पक्कड व तार घेऊन फ्यूजची तार बसवल्याने रस्त्यावर पथदिवे सुरू झाले. यासंदर्भात ते म्हणाले, महावितरण फक्त वाढीव बिलाच्या वसुलीत व्यस्त आहे तर मनपा येणार्या अंतर्गत निवडणुकीच्या कपट कारस्थानांमध्ये व्यस्त आहे. मनपा म्हणते हे महावितरणचे काम आहे तर महावितरण म्हणते हे मनपाचे काम आहे. मात्र, यामुळे आगरकर मळ्यामध्ये रोज रस्त्यावरचे लाईट गायब होऊन सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. मागील आठवड्यापासून रोज हे घडत आहे. अंधारामुळे या परिसरात रोज चोरटे येत आहेत, परंतु कोणालाही त्याचे काहीही देणे-घेणे नाही. अतिशय धोकादायक अवस्थेत उघडे ठेवलेले फ्युज बॉक्स व त्यामध्ये फ्युजच्या ऐवजी बसवलेल्या भंगार तारा व कामचलाऊ केलेले काम याला कारणीभूत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. महापालिकेकडे व महावितरणकडे चिनी मातीची सुरक्षित अवघ्या दोनशे रुपयाला जी फ्युज मिळते, ती देखील घ्यायची ऐपत राहिलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात आयुक्तांपुढे व मुख्य अभियंत्यांपुढे आम्ही फ्यूज बॉक्स मधील फ्युजसाठी भिख मांगो आंदोलन करणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले.
रात्रीच पाठवले व्हिडीओ
जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी स्वतः हातात पक्कड व वायर घेऊन पथदिव्यांच्या फ्युजची केलेल्या दुरुस्तीचा व्हिडिओ तयार केला व रात्रीच संबंधित मनपा व महावितरण अधिकार्यांना पाठवला. अशीच अवस्था शहरातील अनेक प्रभागात आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. नागरिक स्वतः पथदिवे फ्युज दुरुस्तीचे काम करतात, हे पाहून किमान संबंधित अधिकार्यांना काहीतरी वाटावे, एवढीच माफक अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS