नियम पाळा अन्यथा पुढील आठवड्यात लॉकडाऊन :अजित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नियम पाळा अन्यथा पुढील आठवड्यात लॉकडाऊन :अजित पवार

पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे.

किसान क्रांती संघटनेचे धरणे आंदोलन तूर्त स्थगित
उपोषण कर्ते शेख शरीफ यांची प्रकृती खालावलेली
आरोग्य पत्रिकेनुसार पिकांना खते देण्यासाठी जनजागृती सुरू

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. येत्या आठ दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर नाईलाजाने जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ बाबत 2 एप्रिलला निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश देऊन कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांनी नियम कडक पाळावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. 

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री संजय जगताप, दिलीप मोहिते पाटील, सुनील शेळके, अतुल बेनके, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. पुरेसा औषधसाठा, आवश्यक त्या सोयींनी युक्त रुग्णवाहिका, ऑक्सिजन युक्त बेड आदी आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने उपाययोजना गतीने करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.  लॉकडावून मुळे सर्वसामान्यांना त्रास होवू नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे, असे सांगून मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी सीओईपी जम्बो हॉस्पिटल मधील बेडची संख्या आवश्यकतेनुसार 800 पर्यंत वाढवून हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरु करा. पिंपरी चिंचवड मधील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करा. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 50 टक्के राखीव बेड ठेवण्याची कार्यवाही करा, असे सांगून ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोविड लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील  लसीकरण केंद्रे 316 वरुन 600 पर्यंत वाढवण्यात येतील. यासाठी आवश्यक त्या प्रमाणात लस उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. दहावी, बारावी व एमपीएससीच्या परीक्षा पूर्व नियोजित वेळेनुसार होतील. तथापि, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात येत आहेत. इयत्ता दहावी व बारावी वगळून शाळा, महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात येतील. लग्न समारंभ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत व अंत्यसंस्कार 20 व्यक्तींच्या उपस्थितीतच करण्यात यावेत. सार्वजनिक, राजकीय, खाजगी कार्यक्रमांना बंदी राहील, यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

COMMENTS