नागपूर : कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात लोकांना वीज कशी तयार होते याची माहिती देणारा उर्जा पार्क साकारण्यात येणार आहे. या पार्कच्या म
नागपूर : कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात लोकांना वीज कशी तयार होते याची माहिती देणारा उर्जा पार्क साकारण्यात येणार आहे. या पार्कच्या माध्यमातून लोकांना विजेचे उत्पादन, पारेषण व वितरण प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेता येईल. सोबतच नागरिकांना वीज बचतीचा संदेशही दिला जाईल. या प्रकल्प निर्मितीसाठी 125 कोटी रुपये खर्च येणार असून प्रकल्प मंजूरीसाठी परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे आदेश राज्याचे उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित यंत्रणेला आज दिले.
नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयात कोराडी उर्जाशिक्षण पार्क प्रकल्प निर्मिती संदर्भात कामकाजाचा आढावा श्री. राऊत यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. नासुप्रचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, अधिक्षक अभियंता लिना उपाध्ये, वास्तुविशारद अशोक मोखा, कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात लाखो भक्तगण दर्शनाला येतात. याच परिसराला लागून असलेल्या औष्णिक विज निर्मिती केंद्राला पाहून लोकांच्या मनात वीज कशी तयार होते याचे कुतूहल निर्माण होते. येथील परिसरात महाउर्जा पार्क साकारल्याने नागरिकांना विजेचे उत्पादन, पारेषण व वितरण कश्या पध्दतीने होते या प्रक्रियेची संपूर्ण माहिती होईल. पर्यायाने यातून वीज बचतीचा संदेशही लोकांमध्ये पोहोचविला जाईल. यातून नागपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल तसेच रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होईल. त्यामुळे उर्जा पार्क हा लोकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हावे व एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून उदयास येण्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करुन परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. कोराडी येथे निर्माण होणाऱ्या उर्जा शिक्षण पार्क निर्मितीसाठी 125 कोटीचा खर्च येत असून त्यात प्रदर्शन हॉल, वीज निर्मिती शिक्षण मॉडेल, वीज निर्मितीचे विविध मॉडेल्स, व्यावसायिक मुल्याधारित उर्जा पार्क, मुलांसाठी खेळणीचे साहित्य आदी बाबींचा समावेश राहील, अशी माहिती सभापती श्री. सुर्यवंशी यांनी बैठकीत दिली. प्रकल्पाचे नियोजन व विकास आराखडा शासनाच्या मंजूरीसाठी लवकरात लवकर सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
भिक्षू निवास आणि वाचनालय बांधणी व गुरुव्दाराच्या जागा मालकी संदर्भात चर्चा
शहरातील इंदोरा, टेका नाका परिसरातील नझूल जमीनीचा वाद मिटविण्यासाठी तसेच संबंधितांना पट्टे वाटप करताना वर्ष 1995 च्या रेकॉर्डनुसार व नियम 572 नागरि सुधार योजनेअंतर्गत प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करावी. तेथील परिसरातील भिक्षू निवास आणि वाचनालय बांधणी संदर्भात मंदीर पदाधिकारी व बौध्द विहाराच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वयाने जागेचे प्रकरण मार्गी लावण्यात यावे, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. इंदोरा येथील श्री गुरू ग्रंथ साहिब प्रबंधक कमेटीच्या म्हणन्यानुसार तेथील जागा 40 वर्षापासून गुरुव्दाराची आहे. ही जागा कायमस्वरुपी गुरुव्दाराच्या नावे करण्याच्या प्रकरणात सन 1995 पूर्वीचा जमीन मालकी रेकॉर्ड तपासून कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ. राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
COMMENTS