मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे.
पंढरपूर / प्रतिनिधीः ’मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. याच अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातील कायदा तयार करावा,’ अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीकडून करण्यात आली आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर आषाढी एकादशीच्या दिवशी पंढपूरमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा होऊ देणार नाही, असा इशाराही धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक आदित्य फत्तेपूरकर यांनी दिला.
पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वाड्यामध्ये धनगर आरक्षण कृती समितीची आज (15 जून) बैठक घेण्यात आली. या बैठकीत परमेश्वर कोळेकर, आदित्य फत्तेपूरकर, पंकज देवकते, शालिवाहन कोळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर आदित्य फत्तेपूरकर यांनी बैठकीतील चर्चेचा तपशील दिला. ’सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच कारणामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी 16 जूनपासून कोल्हापूर येथे मराठा समाजाकडून आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील कायदा करण्यासाठी राज्य सरकार दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. त्याच अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात कायदा पास करावा,’ अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीकडून करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे. या वेळी धनगर समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लावावा. तेव्हाच पंढरपूर येथील पांडुरंगाच्या शासकीय पूजेला यावे. जर धनगर आरक्षणावर निर्णय घेतला नाही, तर मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला येऊ देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीकडून देण्यात आला.
COMMENTS