राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला. अॅड.
मुंबई / प्रतिनिधी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला. अॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच हा लोकप्रियतेसाठी केलेला स्टंट असल्याचे निरिक्षण नोंदवत पाटील यांना फटकारले आहे.
याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयातील आपल्या याचिकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर न्यायालयाने तीव्र प्रतिक्रिया देत अशा याचिका स्वस्तातील लोकप्रियतेसाठी केल्या जात असल्याचं निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मनिषा पिटाले यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. न्यायालयाने पाटील यांना या प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. यावेळी अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोनी यांनी न्यायालयाला सांगितले, की या प्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आधीच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर याचिका दाखल केलेली आहे. त्यावर बुधवारी (31 मार्च) सुनावणी होणार आहे. या वेळी त्यांनी पाटील यांची याचिका चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचेही म्हटले. दरम्यान, याआधी पाटील यांनी देशमुख यांच्यावरील महिन्याला शंभर कोटी वसुलीच्या आरोपांनंतर मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. “भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक व्हावे,” अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. देशमुख यांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या पत्रात सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत,” असे पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले. तसेच, यामध्ये मास्टरमाईंट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे हे आहेत, असा आरोपही पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीमध्ये केला. देशमुख गृहमंत्री असल्यामुळे कारवाई होत नसल्याचे पाटील यांनी म्हटले होते. जेव्हा एखादा प्रकार निदर्शनास येतो. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून तत्काळ गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे; मात्र या गुन्ह्यामध्ये तशी कारवाई होताना दिसत नाही. आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पुढारी आहेत. त्यामुळे कायदेशी प्रक्रिया पार पाडली गेली नाही. किंवा परमबीर सिंग यांनी तशी हिम्मत दाखवली नाही. त्यामुळे सध्याचे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणामध्ये संबंधितांविरुध गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे,” असा आरोप पाटील यांनी त्यांच्या तक्रारीत केला.
COMMENTS