देशमख गोत्यात

Homeसंपादकीय

देशमख गोत्यात

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत पूर्वी कधीही गैरव्यवहाराचे आरोप झाले नव्हते.

धार्मिक स्थळे आणि कोरोना !
एक धक्कादायक अर्थ विश्व…..
आर्थिक समतेचे काय

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत पूर्वी कधीही गैरव्यवहाराचे आरोप झाले नव्हते. वारंवार मंत्रिमंडळात राहूनही त्यांची प्रतिमा स्वच्छ होती; परंतु मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी शंभर कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला, तेव्हा तो सूडबुद्धीने केला असेल, असा समज झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार सीबीआय, ईडी, प्राप्तिकर खात्याचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे अजूनही ठामपणे सांगत आहेत; परंतु आता बारमालकांचे जबाब, अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेली गाडी ठेवणे आणि मनसुख हिरेन यांच्या खूनप्रकरणी बडतर्फ असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचा जबाब पाहता देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

उशिरापर्यंत बार चालू ठेवण्यासाठी वाझेला चार कोटी ऐंशी लाख रुपये दिले जात होते, असे दहा बार मालकांनी वारंवार केलेल्या चौकशीत ईडीपुढे सांगितले. हे पैसे वाझे देशमुख यांच्या स्वीय सहायकाकडे देत होते, असे आता ईडीने न्यायालयातील युक्तीवादात नमूद केले आहे. देशमुख यांचा एक स्वीय सहायक उपजिल्हाधिकारी दर्जाचा आहे, तर एक त्यांचा खासगी स्वीय सहायक आहे. या दोघांना आता अटक झाली आहे. देशमुख यांना बार मालकांकडून चार कोटी रुपये मिळाले होते, असे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयाला सांगितले आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून देणगीच्या स्वरूपात त्याने ही रक्कम त्यांच्या ट्रस्टकडे वर्ग केली. देशमुख यांच्या दोन मुलांनी कोलकात्यातील चार कंपन्या विकत घेतल्या. या कंपन्यांत ही रक्कम गुंतविली असल्याची शंका ईडीला आहे. त्यामुळे आता देशमुख यांच्या दोन्ही मुलांवरही ईडीची नजर आहे. देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे आणि खासगी सचिव कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली. हे दोघे एक जुलैपर्यंत ईडीच्या रिमांडवर आहेत. त्यांच्यावर देशमुखांना पैशाच्या गैरव्यवहारात मदत केल्याचा आरोप आहे. शनिवारी ईडीने देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावले होते; परंतु देशमुख यांनी ईडीने केलेले आरोप व त्यासंबंधीची कागदपत्रे मिळेपर्यंत चौकशीला हजर राहणार नसल्याचे सांगितले, तसेच पुढची तारीख देण्यास सांगितले. तीन दिवसांपूर्वी ईडीने देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरांवर छापा टाकला. देशमुख यांची सलग नऊ तास चौकशी केली. तेच कारण आता देशमुख यांनी ईडीसमोर हजर न होण्यास दिले. वय, आजारपण आदी कारणेही त्यांनी दिली असली, तरी ती ईडीला पटण्यासारखी नाहीत. ईडीच्या अधिकार्‍यांनी देशमुख यांच्या घरातून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. सचिन वाझे यांचा जबाब ही तळोजा तुरूंगात जाऊन नोंदविण्यात आला आहे. शनिवारी जरी देशमुख यांनी ईडीसमोर हजर होण्यास टाळाटाळ केली असली, तरी देशमुख यांना पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांची खंडणी केल्याच्या आरोपावरून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. दुसरीकडे अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआय तपास करीत आहे. या तपासात राज्य सरकार सहकार्य करीत नाही, अशी तक्रार यापूर्वीच सीबीआयने उच्च न्यायालयात केली आहे, तर राज्य सरकारनेही सीबीआय आपली कार्यकक्षा ओलांडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला आहे. तपास यंत्रणेची विश्‍वासार्हता आणि सरकारचा पारदर्शकपणा यातील ही लढाई आहे. त्यात शह-काटशह दिला जात आहे. परस्परांना चकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर ईडीच्या तपासात देशमुख यांचा एक स्वीय सहायक एक सौदा करायचा आणि दुसरा गोळा करायचा, असे तपासात पुढे आले असेल,तर देशमुख यांचा पाय खोलात चालला आहे, असे म्हणावे लागेल. ईडीला त्यांच्याविरोधात फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप कॉलसह अनेक पुरावे सापडले आहेत; परंतु ते देशमुख किंवा अन्य कोणासाठी पैसे वसूल करीत होते, की नाही याची अद्याप खात्री झालेली नाही. सध्या ईडी या दोघांची चौकशी करत आहे. देशमुख यांच्यासमोर बसून लवकरच त्यांची चौकशी केली जाईल. पलांडे यांच्या वकिलांनी ईडीला ’पिंजर्‍यातला पोपट’ म्हणून संबोधित केले; परंतु त्यावर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. देशमुख यांच्या अगदी जवळच्या असलेल्या सागर नावाच्या व्यक्तीच्या घरी आणि कार्यालयातही छापे टाकण्यात आले. देशमुख यांच्या  तीन डझनहून अधिक कंपन्यांमध्येही सागर संचालक होता. त्यांचा कोलकातामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय असल्याचे सांगितले जात आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर देशमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आर्थिक व्यवहार तपासायला सुरुवात केली आहे. यादरम्यान देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांनी कोलकाता येथील एका कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याचे उघड झाले आहे. सलील आणि ऋषिकेश देशमुख यांनी गुंतवणूक केलेल्या एका कंपनीचे नाव पुढे आले आहे. या कंपनीचे नाव झोडियाक डेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड असे आहे. दोघा भावंडांनी मार्च 2019 मध्ये झोडियाक डेलकॉम ही कंपनी आणि तिच्या उपकंपन्या विकत घेतल्या. यामध्ये जेम्स प्रायव्हेट लिमिटेड, काँक्रीट रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, अटलांटिक व्हिसा प्रायव्हेट लिमिटेड आणि काँक्रीट इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या चारही उपकंपन्या सलील आणि ऋषिकेश देशमुख यांच्या नावावर आहेत. या झोडियाक कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा संशय सीबीआयला आहे.

COMMENTS