देशभर यंदा जास्त आनंदधारा ; कोकणात जास्त पाऊस; मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशभर यंदा जास्त आनंदधारा ; कोकणात जास्त पाऊस; मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस

भारतीय हवामान विभागाने आपला दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी जाहीर केला असून त्यानुसार देशभरात जून ते सप्टेंबर या कालावधीत 101 टक्के पावसाची शक्यता आहे.

बबनराव घोलप यांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी
पतंगाच्या मागे धावला नि होत्याचे नव्हते झाले | LOKNews24
उपयुक्तता आणि राजकारण

पुणे / प्रतिनिधी : भारतीय हवामान विभागाने आपला दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी जाहीर केला असून त्यानुसार देशभरात जून ते सप्टेंबर या कालावधीत 101 टक्के पावसाची शक्यता आहे. या वेळी प्रथमच देशातील 36 हवामान विभागातील पावसाचे प्रमाण कसे असेल, याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

    भारतीय हवामान विभागाने एका आभासी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली. nप्रशांत महासागरात ’ला लिना’ स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्य मॉन्सूनला होणार आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 101 टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यात चार टक्के कमी अथवा अधिक फरक गृहीत धरण्यात आला आहे. त्याचबरोबर वायव्य भारतात (92 ते 108 टक्के) सर्वसाधारण, दक्षिण द्वीपकल्पमध्ये (93 ते 107 टक्के) साधारण पाऊस असेल, तर उत्तर पूर्व भारत (95 टक्क्यांहून कमी) सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्तता आहे. मध्य भारतात (106टक्क्यांहून अधिक) सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या केरळमध्ये पाऊस पडत असला तरी मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाले, हे जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेले पाऊसमान, वार्‍यांची दिशा हे निकष पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे यंदा मॉन्सूनला उशीर होण्याची शक्यता असून तीन जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याबरोबर केरळमध्ये मॉन्सून आल्यानंतर हवामानाची स्थिती लक्षात घेऊन पुढील पाच दिवसात मॉन्सूनची वाटचाल कशी राहील हे जाहीर केले जाते. त्यामुळे केरळनंतरही मॉन्सूनची पुढील वाटचाल ही उशिरा राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पावसाची टक्केवारी शक्यता टक्के

90 टक्क्यांपेक्षा कमीः 8

सरासरीपेक्षा कमी 90 ते 96ः 18

सर्वसाधारण 96 ते 104ः 40

सरासरीपेक्षा जास्त 104 ते 110ः 22

*खूप जास्त 110 पेक्षा अधिकः 12

जूनमध्ये सरासरी पाऊस

’मल्टी मॉडेल’नुसार यंदा जूनमध्ये देशभरात पावसाचे प्रमाण हे सर्वसाधारण असणार आहे. जूनमध्ये मध्य भारतातील पूर्वेकडील भाग, हिमालय परिसर, आणि पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी वायव्य भारताचा बहुतांश भाग, दक्षिण भारत आणि उत्तरपूर्व भारतात अनेक ठिकाणी कमी पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जून महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे.

शेतीच्या क्षेत्रात 106 टक्के पाऊस

भारताच्या दृष्टीने शेतीचे क्षेत्र व त्या ठिकाणी पडणारा पाऊस अतिशय महत्वाचे ठरते. त्यादृष्टीने हवामान विभागाने यंदा प्रामुख्याने शेती क्षेत्राचा समावेश असलेल्या कोअर झोन निश्‍चित केला आहे. त्या ठिकाणी 106 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी वेगळा अंदाज जाहीर करणार आहे.

कोकण, पूर्व विदर्भात जूनमध्ये अधिक पाऊस

हवामान विभागाने यंदा प्रथमच हवामान विभागानुसार अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार कोकण, आणि पूर्व विदर्भात जून महिन्यात सरासरीच्या तुुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असणार आहे.

COMMENTS