देशभरात 2 लाख कोटींचे बोगदे बनविणे सुरु आहे. बोगद्यांमुळे प्रवासाचे अंतर कमी होते. गंतव्य ठिकाणी लवकर पोचणे शक्य होते.
नवी दिल्ली : देशभरात 2 लाख कोटींचे बोगदे बनविणे सुरु आहे. बोगद्यांमुळे प्रवासाचे अंतर कमी होते. गंतव्य ठिकाणी लवकर पोचणे शक्य होते. बोगदे बनविताना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. हिमाचल प्रदेशात रोहतांग येथे अटल बोगद्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
हिमाचल प्रदेशात आज 6155 कोटींच्या 222 किमी लांबीच्या महामार्गाच्या 9 प्रकल्पांचा शिलान्यासव लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री जन. व्ही. के. सिंग व अन्य उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले की, रस्ते निर्माणामुळे संबंधित क्षेत्र हे प्रगतीकडे जाते. रस्तेच क्षेत्राचे भविष्य बदलू शकतात. हिमाचलमध्ये 23 बोगदे बनविले जात आहे. यापैकी 8 बोगद्यांचे काम सुरु असून उर्वरित बोगदे वर्षभरात बनविले जातील. नियोजन करून विकास झाला पाहिजे. तसेच विकास करताना गरिबांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. रस्त्याशेजारी लहान लहान गावांचा विकास व्हावा, या दृष्टीने नियोजन करून विकास साधला जावा, असेही त्यांनी सांगितले. आगामी काळात हिमाचलमध्ये 1500 कोटी रुपयांचे 421 किमी लांबीचे महामार्ग होणार आहेत. रस्त्यांची कामे करताना भूसंपादनात येणार्या अडचणी दूर व्हाव्यात. सध्या 10 हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरु आहेत. तसेच केंद्रीय मार्ग निधीत प्रस्तावित करण्यात आलेली सर्व कामे मंजूर करण्यात आली आहे. रस्त्यांशिवाय प्रगती नाही, हे लक्षात घेता हिमाचल प्रदेश सरकारच्या मागे केंद्र शासन सर्व शक्तिनिशी उभे आहे, असेही ते म्हणाले.
हा प्रदेश पहाडीक्षेत्राचा असल्यामुळे रोप वे, केबल कारच्या माध्यमातून एका पहाडावरून दुसर्या पहाडावर जाता येणे शक्य होणार आहे. 2 लाख कोटी खर्च करून रोप वे, केबल कार, बायनाकुलर रेल्वे हे प्रकल्प येथे राबवू, असे गडकरींनी सांगितले. राज्य शासनाने या संदर्भात धोरण तयार करावे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून हे प्रकल्प राबवू. यामुळे हजारोंना रोजगार मिळेल. हिमाचल जगातील सुंदर, स्वस्त, आर्थिक दृष्ट्या समृध्द व्हावा, यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन गडकरी यांनी केले.
COMMENTS