Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुसर्‍याच्या मतदारसंघात हस्तक्षेप योग्य आहे का ?

आ. बालाजी कल्याणकर यांचा हदगावच्या शिवसेनेच्या आमदारांना प्रतिप्रश्‍ननांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेत (शिंदे ग

नांदेडचे शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराच्या दलदलीत !
Nanded : पंजाबच्या भाविकाने दिला पावणेदोन कोटी रुपयांचा सोनेरी मुकुट (Video)
विकसित नांदेडचा जाहीरनामा की जुन्याच अपयशांचा पुनरुच्चार ?

आ. बालाजी कल्याणकर यांचा हदगावच्या शिवसेनेच्या आमदारांना प्रतिप्रश्‍न
नांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेत (शिंदे गट) अंतर्गत विसंवाद व कुरघोडीचे राजकारण चव्हाट्यावर आले असून दुसर्‍याच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणे योग्य आहे का? या प्रश्‍नाने राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना डावलून अपक्ष उमेदवारांच्या प्रचारात शिवसेनेचे आमदार उतरल्याचा गंभीर आरोप करत नांदेड उत्तर चे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर यांनी थेट जाहीर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ही नांदेडच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवसेनेत घडलेली पहिलीच अशी धक्कादायक घटना असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. हदगाव – हिमायतनगरच्या शिवसेनेच्या आमदारांनी नांदेड उत्तरमध्ये हस्तक्षेप करणे योग्य आहे का? असा प्रति प्रश्‍न त्यांनी स्वपक्षातील आमदारांना केला आहे.
शिवसेनेने प्रभाग क्रमांक तीनमध्ये करुणा कोकाटे, संदीप गाडीवाले, प्रतीक्षा गजभारे आणि सुशील चव्हाण यांना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून बी-फॉर्म दिले होते. हे बी-फॉर्म पक्षाच्या सचिवांच्या स्वाक्षरीने आणि जिल्हाप्रमुखांच्या शिफारशीने दिले गेले होते. त्यामुळे मी मीनल पाटील यांचे तिकीट कापले, त्यांना विरोध केला असे आरोप सरळसरळ खोटे असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी शिवसेनेच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यामध्ये माझी काय चूक झाली हे मला चार भिंतीच्या आत सांगायला हवे होते. पक्षाने दिलेले उमेदवार शिवसेनेच्या आमदारांनी मान्य करायला हवे होते. मात्र तसे झाले नाही, हे दुर्दैवी आहे. शिवसैनिकांचे खच्चीकरण आमदारांनी करणे योग्य नाही. ही बाब अत्यंत वेदनादायी आहे, असे परखड शब्दांत आमदारांनी सांगितले. याच वेळी त्यांनी श्याम कोकाटे प्रकरणाचाही उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली. श्याम कोकाटे हे पूर्वी काँग्रेसचे नगरसेवक होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपात जाण्याच्या तयारीत होते. मात्र माझ्या सांगण्यावरून ते शिवसेनेत आले. त्यांचा पक्षप्रवेश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. त्या वेळी शिंदे साहेबांनी महानगरपालिकेत शंभर टक्के उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. शिंदे साहेब हे शब्द पाळणारे नेते आहेत. मी त्यांचा शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळेच करुणा कोकाटे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली, असा खुलासा आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला आहे.

मी बंडखोरी केलेली नाही ः मीनल पाटील
मी सांगवी प्रभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या विरोधात बंडखोरी केलेली नाही. निवडणूक लढविण्याचा अधिकार मला आहे. माझ्या पाठीमागे शिवसेनेचे तीन आमदार प्रचार करत असतील, तर तो शिवसेनेचाच पाठिंबा आहे. जनता माझ्या पाठीशी आहे. माझी उमेदवारी योग्य आहे की नाही, हे जनता ठरवेल, असे मीनल पाटील यांनी स्पष्ट केले.

COMMENTS