तुम्ही कशासाठी बाहेर पडला आहात ; भोसले-पाटील यांच्याकडून नागरिकांना विचारणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुम्ही कशासाठी बाहेर पडला आहात ; भोसले-पाटील यांच्याकडून नागरिकांना विचारणा

रस्त्याने चाललेल्या दुचाकीस्वारास वा चारचाकीतील मान्यवरास थांबवून तुम्ही कशासाठी बाहेर पडला आहात, घराबाहेर पडण्याचे काही अति महत्त्वाचे कारण आहे काय, अशी विचारणा प्रत्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.

रेनबो स्कूल आयोजित वत्कृत्व स्पर्धा उत्साहात
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकून दाखवू
अखेर संपत सूर्यवंशी यांचा बनावट प्रस्ताव प्रकरणाचा कबुलीजबाब l पहा LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी- रस्त्याने चाललेल्या दुचाकीस्वारास वा चारचाकीतील मान्यवरास थांबवून तुम्ही कशासाठी बाहेर पडला आहात, घराबाहेर पडण्याचे काही अति महत्त्वाचे कारण आहे काय, अशी विचारणा प्रत्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी अनेकांना केली. दोघांनीही रस्त्यावर उतरून संचारबंदीची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, याची प्रत्यक्ष पाहणी केली व फ़िरणार्‍या नागरिकांना विविध प्रश्‍न विचारले. ज्यांची उत्तरे संयुक्तिक नव्हती त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी समवेत असलेल्या पथकाला दिल्या. 

कोरोना पार्श्‍वभूमीवर राज्यभरात संचारबंदी लागू केली असताना त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले व पोलीस अधीक्षक पाटील यांनी प्रत्यक्षात रस्त्यावर घेऊन वाहनांची तपासणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील डीएसपी चौक तसेच पत्रकार चौक, दिल्लीगेट व कापड बाजार या महत्त्वाच्या ठिकाणी वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी स्वतः या दोन्ही अधिकार्‍यांनी पाहणी करून तपासणी सुरू केली. यावेळी अनेक नागरिकांना त्यांच्या घराबाहेर पडण्याच्या कारणांची विचारणा करण्यात आली, त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे व इतर बाबींची तपासणी पोलिसांनी केली. ज्यांची खरोखर अडचण होती व त्यांना घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता, त्यांना सोडून देण्यात आले. मात्र जे काही काम नसताना हिंडत होते, अशांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर काही ठिकाणी वाहने सुद्धा जप्त करण्यात आली. प्रत्येक चौका-चौकांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. कोरोना पार्श्‍वभूमीवर सध्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असतानाच कडक निर्बंध राज्य सरकारने लागू केले आहेत. त्यानंतर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तरीही गुरुवारी नगर शहरामध्ये अनेक नागरिक रस्त्यावर दिसून येत होते, काही जण रुग्णालयांमध्ये तर काहीजण औषध घेण्यासाठी बाहेर पडले होते, पण अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी तसेच नागरिकांना विचारणा पोलिसांकडून केली जात होती.

“नगर शहरामध्ये आम्ही आज पाहणी केलेली आहे. विनाकारण लोक रस्त्यावर फिरत असल्याचे सुद्धा आढळून आले आहेत. कोणीही घराबाहेर पडू नये व संचारबंदी नियमांसह कोविड नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहनसुद्धा केले असताना जर असा प्रकार सातत्याने राहिला तर आम्हाला कडक कारवाई करावी लागेल.” डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

“अत्यावश्यक बाबी आहेत, त्या घेण्यासाठी फक्त नागरिकांनी घराबाहेर पडले पाहिजे. जर किराणा माल संपला असेल तर नजीकच्या किराणा व्यापार्‍याकडून तो घेतला गेला पाहिजे. त्यासाठी गावात येण्याची गरज नाही. जर नागरिकांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आम्हाला कडक पावले उचलावी लागतील. संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत”. मनोज पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक

रुग्णांच्या बेडसाठी विशेष पथक

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अनेकांना बेड मिळू शकत नाही. तो कसा उपलब्ध करता येईल, यासाठी उपजिल्हाधिकारी स्तरावर सहा जणांची एक तुकडी तैनात करण्यात आलेली आहे तसेच 24 तास हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी केलेला आहे. आतापर्यंत या ठिकाणी 200 हून अधिक जणांनी चौकशी केलेली आहे, प्रत्यक्षात रुग्णांना कशा पद्धतीने बेड तात्काळ उपलब्ध होईल,यावर  प्रशासनावर लक्ष केंद्रीत केले आहे, असे जिल्हाधिकारी भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच रेमडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असला तरी त्यासाठी सुद्धा स्वतंत्र यंत्रणा उभी केलेली आहे व त्यासाठी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. आतापर्यंत अनेकांनी या ठिकाणी जाऊन चौकशी केलेली आहे. हे इंजेक्शन कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल, याची सुद्धा सूचना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS