अहमदनगर/प्रतिनिधी-सर्वप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये नगर जिल्हा राज्यात क्रमांक एकवर असल्याने जिल्ह्याची ही नामुष्की दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. रा
अहमदनगर/प्रतिनिधी-सर्वप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये नगर जिल्हा राज्यात क्रमांक एकवर असल्याने जिल्ह्याची ही नामुष्की दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतीच जामखेड तालुक्यातील खर्डा येथे व कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे नवीन पोलिस ठाणी करण्यास मंजुरी दिली आहे. याआधी पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वरच्या स्वतंत्र पोलिस ठाण्यासही मंजुरी मिळालेली आहे. या पार्श्वभूमीवर अजून सहा नवी पोलिस ठाणी जिल्ह्यात प्रस्तावित असून, त्यांना मंजुरी मिळवण्यासाठी राजकीय ताकद लावण्याची गरज दिसू लागली आहे.
नगर जिल्ह्यात यामागील भाजप सरकारच्या काळात नेवासे तालुक्यात शनि शिंगणापूर व राहाता तालुक्यात आश्वी अशी दोन पोलिस ठाणे नवीन निर्माण केली होती. तर आताच्या महाविकास आघाडी सरकारने जामखेडमधील खर्डा व कर्जतमधील मिरजगावला नवीन पोलिस ठाणे मंजूर केले आहे. याआधी टाकळी ढोकेश्वरचेही पोलिस ठाणे मंजूर असून, या तीन नव्या पोलिस ठाण्यांची हद्द निश्चितीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. ती झाल्यावर या तिन्ही पोलिस ठाण्यांचे स्वतंत्र कामकाज सुरू होणार आहे.
नवे सहा प्रस्ताव प्रतीक्षेत
जिल्हा पोलिस दलाने जिल्ह्यात आणखी सहा नवी पोलिस ठाणी निर्माण करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत. यात नगर शहरात तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सावेडी व कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून केडगाव अशी दोन स्वतंत्र पोलिस ठाणी प्रस्तावित आहेत. याशिवाय पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार व शेवगाव तालुक्यातील बोधेगाव तसेच राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व नेवासे तालुक्यातील कुकाणे अशी अन्य चार नवी पोलिस ठाणी प्रस्तावित आहेत. या सहा नव्या पोलिस ठाण्यांच्या अंतिम मंजुरीसाठी जिल्ह्यातील तीन मंत्री म्हणजे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ताकद लावण्याची गरज आहे.
काही सुधारित प्रस्ताव
नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती त्या परिसरातील गुन्ह्यांच्या एकूण प्रमाणावर ठरवली जाते. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार व शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याने येथे नवी पोलिस ठाणी निर्माण होणे निकषानुसार अवघड असल्याने हे प्रस्ताव सुधारित करून पाथर्डी पूर्व-पश्चिम व शेवगाव पूर्व-पश्चिम अशी या दोन्ही तालुक्यांना प्रत्येकी दोन स्वतंत्र पोलिस ठाणी करण्यासह शिर्डीच्या उत्तर भागातील काही गावे कोपरगाव पोलिस ठाण्यास जोडण्याबाबतचे सुधारित प्रस्तावही करण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, राहाता तालुक्यातील काही गावे संगमनेर तालुक्यातील पोलिस ठाण्यास जोडण्याच्या विषयावरून नुकतेच मंत्री थोरात व आ. राधाकृष्ण विखे यांच्यात संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावे शेजारच्या दुसर्या पोलिस ठाण्यास संलग्न करण्याची ही जोडाजोडी पोलिस दलातर्फे अधिक संयमाने व सावधपणे हाताळली जात आहे.
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नगर जिल्ह्याचे 14 तालुक्यांचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही जास्त आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी अवघे 7 पोलिस उपअधीक्षक आहेत. त्यामुळे नवी पोलिस ठाणी तसेच वरिष्ठ अधिकारी व पोलिस कर्मचारी संख्या वाढणे गरजेचे आहे.
मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, अहमदनगर
COMMENTS