जगणे झाले महाग!

Homeसंपादकीय

जगणे झाले महाग!

कागदोपत्री डाळी व तेलाचे भाव कमी होत असल्याचे दाखविले जात असले, तरी प्रत्यक्षात जनतेला त्याचा अनुभव येत नाही.

नवे शिक्षण धोरण
ओबीसी आरक्षण आणि राज्य सरकारची नाचक्की
वाढते प्रदूषण चिंताजनक

कागदोपत्री डाळी व तेलाचे भाव कमी होत असल्याचे दाखविले जात असले, तरी प्रत्यक्षात जनतेला त्याचा अनुभव येत नाही. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहेत. 


गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 12.94 टक्क्यांवर झेपावला असून निर्देशांक अस्तित्वात आल्यापासूनचा तो सर्वाधिक ठरला आहे. गेल्या वर्षी टाळेबंदीनंतरच्या मेमध्ये तो उणे (-) 3.37 टक्के होता, तर एप्रिल 2021 मध्ये तो 10.49 टक्के नोंदला गेला होता. यंदा सलग पाचव्या महिन्यात त्यात वाढ झाली आहे. महागाईत इंधन दरवाढीचा या वेळी जवळपास दुप्पट, 37.61 टक्के हिस्सा राहिला आहे. इंधनाबरोबरच निर्मित वस्तूची महागाई दुहेरी अंकापर्यंत पोहोचली आहे. अन्नधान्याच्या महागाईचा दर 4.31 टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रामुख्याने या गटातील कांद्याच्या 23 टक्के किमतवाढीचा भार त्यावर पडला आहे. जूनमधील महागाई दर विक्रमी नसला, तरी 12 टक्क्यांपर्यंत असेल, असा अंदाज ‘इक्रा’ वित्तसंस्थेच्या मुख्य अर्थजज्ज्ञ अदिती नायर यांनी व्यक्त केला आहे. ’भारतात व्याजदरासाठी महत्त्वाची मोजपट्टी मानला जाणारा किरकोळ महागाई निर्देशांक यंदाच्या मेमध्ये 6.3 टक्के नोंदला गेला. गेल्या सहा महिन्यांतील हा सर्वाधिक स्तर आहे. ’अन्नधान्याच्या वाढत्या किमतीपोटी रिझर्व्ह बँकेसाठी सहनशील अशा चार टक्क्यांच्या पुढे यंदा तो पोहोचला आहे. आधीच्या, एप्रिलमध्ये किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक 4.23 टक्के होता. यंदा अन्नधान्याच्या किमती दोन टक्क्यांवरून दुपटीने अधिक म्हणजे पाच टक्के झाल्या आहेत. वाढत्या महागाईपोटी रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा व्याजदर कपात टाळली होती. देशात इंधन दरवाढ कायम असून, अनेक ठिकाणी पेट्रोलने लिटरमागे शंभरी पार केली आहे. देशातील इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. 29 मे रोजी मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीपार गेले होते. सध्या मुंबईत पेट्रोल 102.58 रुपये, तर डिझेल 94.70 रुपये आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची ओरड सर्वत्र होत आहे; पण महागाईची ही झळ केवळ इंधनापुरती मर्यादित नाही. खाद्यतेले, डाळी, भाज्या असे सारे काही प्रचंड महागले आहे. मागील तीन महिन्यांचा विचार केल्यास सर्व घटकांमध्ये किमान दुप्पट दरवाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका सर्वसामान्यांना बसत असतो. तीन महिन्यांपूर्वी मुंबईत 88.50 रुपये प्रति लिटर असलेला डिझेलचा दर आता 94.50 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. तीन महिन्यांत डिझेलचा दर प्रतिलिटर सहा रुपयांनी वाढल्याने मालवाहतुकीच्या भाड्यातही वाढ झाली आहे. टाळेबंदीमुळे मागणी कमी असूनही डाळींचे दर प्रचंड वाढले आहेत. तीन महिन्यांपूर्वी सरासरी 100 रुपये किलोदरम्यान असलेल्या डाळी आता 150 रुपये किलोच्यावर पोहोचल्या आहेत. दुसरीकडे खाद्यतेलांचे दर व उपलब्धता यांचा मेळ पूर्णपणे बिघडला आहे. भारतात दरवर्षी एकूण गरजेच्या 60 टक्के खाद्यतेल आयात होते. हे प्रमाण 25 ते 30 टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे तीन महिने आधी सरासरी 110 ते 125 रुपयांदरम्यान असलेले खाद्यतेल आता 180-200 रुपयांच्या घरांत गेले आहे. ’खाद्यतेलाची आयात घटली आहेच. शिवाय यावर पाच टक्के जीएसटीदेखील आकारला जात आहे. हा जीएसटी वगळला तरी खाद्यतेले काही प्रमाणात स्वस्त होतील. जागतिक बाजारात कच्च्या तेलाने तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. अनलॉकमुळे वाहतूक पूर्वपदावर येत असून इंधन मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाचा भाव 73 डॉलर प्रतिपिंप या तीन वर्षांच्या उच्चांकी स्तरावर गेला आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव 0.44 डॉलरने वधारला आणि 73.30 डॉलर प्रती बॅरल झाला. कच्च्या तेलाचा मागील तीन वर्षांतील सर्वोच्च दर आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून नजीकच्या काळात इंधन दरवाढ सुरुच ठेवण्याची शक्यता आहे. मागील दीड महिन्यात कंपन्यांनी 25 वेळा इंधन दरवाढ केली आहे. यात पेट्रोल सहा रुपयांनी महागले आहे. तर डिझेलमध्ये 6.50 रुपयांनी वाढले आहे. सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात 29 पैसे आणि डिझेलमध्ये 30 पैसे वाढ केली होती तर रविवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. देशातील डाळींच्या वार्षिक खपाच्या तुलनेत जवळपास निम्मी डाळ आयात करावी लागते. सर्वसामान्यांसाठी डाळीचे भाव घसरणे चांगली बातमी असली तरी शेतकर्‍यांना मात्र नुकसान होईल. कारण मूग, उडीद आणि चण्याचे भाव किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) खाली आले आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईच्या आकड्यांत घट आली; मात्र आपल्या स्वयंपाकघरात ठाण मांडलेली महागाई घरातून बाहेर जाण्याचे नाव घेत नाही. जानेवारीपासून आतापर्यंतचे आकडे पाहिल्यास भाज्या आणि तांदळाशिवाय सर्व खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. यामध्येही खाद्यतेल आणि डाळी प्रामुख्याने महाग झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यांच्या किमतीत कोणताही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. मुगाशिवाय सर्व प्रकारच्या डाळींच्या किमतीत चार महिन्यांत चांगली वाढ नोंदली आहे. रब्बीत गव्हाची आवक होते, असे असताना जानेवारीच्या तुलनेत मेमध्ये आट्याच्या भावात वाढ झाली.

COMMENTS