खासगी हॉस्पिटल्स बदनामीच्या गर्तेत ; आक्षेपांकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासगी हॉस्पिटल्स बदनामीच्या गर्तेत ; आक्षेपांकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष?

हॉस्पिटल व हॉटेलचे हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या नगर शहरातील खासगी हॉस्पिटल्सने सध्या बदनामीची परिसीमा गाठली आहे.

*मराठा आरक्षणाच्या अहवालातील 4 हजार पाने गायब? पहा सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24*
राहाता नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचार्‍यांचे उपोषण
कोपरगावचा सोमवारचा आठवडे बाजार बंद ः मुख्याधिकारी जगताप

अहमदनगर/प्रतिनिधी- हॉस्पिटल व हॉटेलचे हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या नगर शहरातील खासगी हॉस्पिटल्सने सध्या बदनामीची परिसीमा गाठली आहे. खासगी हॉस्पिटल्समधील रुग्णांची आर्थिक लूट व तेथे होणारे मृत्यू यावरून रोज जिल्हा प्रशासनाकडे आक्षेप अर्ज दाखल होत आहेत, चौकशांची व कारवाईची मागणी होत आहे. पण जिल्हा व मनपा प्रशासन याकडे काणाडोळा करीत आहे तर दुसरीकडे हॉस्पिटल्सची संघटना असलेल्या इंडियन मैफिकल असोसिएशनच्या नगर शाखेनेही मौन पत्त्करले असून, खासगी हॉस्पिटल्सवर घेतल्या जात असल्या आक्षेपांवर भूमिका मांडायला अजून तयारी दाखवलेली नाही.

    नगरमध्ये 203 छोटी-मोठी हॉस्पिटल्स आहेत. शहराच्या बहुतांश सर्वच भागात हॉस्पिटल्सचे जाळे विस्तारले आहे. बीड व मराठवाडा परिसरातील रुग्णांना पुण्यात जाऊन उपचार घ्यायला परवडत नसल्याने नगरला उपचार घेणे पसंत केले जाते. शिवाय नगरमधील बहुतांश रुग्णालयांनी पुण्या-मुंबईच्या तज्ज्ञांच्या ऑनलाईन सेवा आपल्या रुग्णालयात सुरू केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना पुण्या-मुंबईच्या तज्ज्ञांकडून उपचार मार्गदर्शन मिळते. त्यामुळे नगरचे नाव रुग्णसेवेबाबत सर्वदूर पोहोचले आहे व त्याचा फायदा येथील हॉस्पिटल विश्‍वाला होऊन बहुतांश हॉस्पिटल्स टोलेजंग झाले आहेत. या हॉस्पिटल्सची रुग्ण सेवा, मोफत आरोग्य निदान शिबिरे व अन्य सामाजिक कामे नगरच्या माध्यमजगतातूनही आवर्जून गौरवली गेली आहे व अजूनही जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर मागील एक वर्षापासून नगरचे हे हॉस्पिटल विश्‍व खलनायक झाले आहे. मागील मार्चमध्ये कोरोनाचे आगमन झाले, तेव्हा खासगी हॉस्पिटल्सला या रुग्णांवरील उपचारांना मनाई होती. पण रुग्णसंख्या जशी वाढू लागली व दुसरीकडे सिव्हील हॉस्पिटल्स व बूथ हॉस्पिटल्ससह अन्य शासकीय हॉस्पिटल्समधील रुग्णसुविधांची वानवा पुढे आली. त्यामुळे सरकारने कोविड केअर सेंटर म्हणून खासगी हॉस्पिटल्सला कोरोना रुग्णांवर उपचार करण्याला मान्यता दिली. नगरमध्ये सध्या अशी 70वर कोविड सेंटर्स खासगी हॉस्पिटल्समध्ये आहेत. त्यांचा फायदा रुग्णांनाही झाला. अनेक रुग्ण बरे झाले, पण या फायद्यापेक्षा तोटा जास्त चर्चेत राहिला तो खासगी हॉस्पिटल्समध्ये वाढलेला मृत्यूदर तसेच या हॉस्पिटल्सकडून रुग्णांची होत असलेली आर्थिक लूटमार यामुळे. मागील वर्षीच्या कोरोना काळात शहरातील 15 हॉस्पिटल्सने रुग्णांकडून तब्बल 1 कोटी 13 लाख जास्त घेतले व ते परत करण्याचे आदेश देऊनही त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहात नाही. हे चित्र एक वर्ष झाले तरी कायम आहे व ते थांबायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस अधिक भयानक होऊ लागले आहे. खासगी रुग्णालयांतून होणारी आर्थिक लूटमार थांबवण्यासाठी मनपाने चक्क या रुग्णालयांतून ऑडिटर नेमले, पण ही नामुष्कीही खासगी हॉस्पिटल्स वा इंडियन मेडिकल असोिएशनच्या नगर शाखेला गांभीर्याची वाटत नाही, हे दुर्दैव ठरले आहे. नगरमधील अनेक स्वयंसेवी-सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारांनी खासगी हॉस्पिटल्सच्या रुग्णसेवेवर अनेक आक्षेप नोंदवले आहेत. पण जिल्हा व मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून तेरीभी चूप, और मेरीभी चूप, असे धोरण घेतल्याचे दिसू लागले आहे. पण यामुळे डॉक्टरांची रुग्णांच्या नातेवाईकांना व नातेवाईकांकडून डॉक्टर व त्यांच्या स्टाफला मारहाणीच्या घटना वाढू लागल्या आहेत. यातून हॉस्पिटल हब असलेल्या नगरची बदनामीही होऊ लागली आहे. नगरमध्ये खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही तसेच येथील उपचारात जीविताचीही हमी नाही, असा संदेश सर्वदूर जाऊ लागला आहे. त्यामुळे जेव्हा कोविड लाट ओसरेल, तेव्हा नगरचे खासगी हॉस्पिटल विश्‍व पुरते बदनाम होऊन त्याचा फटका त्यांच्या वाटचालीला बसणार आहे.

खासगी हॉस्पिटल्सवर आहेत आक्षेप..

-एकाच एम.डी. मेडिसीन डॉक्टरच्या नावावर 7-8 ठिकाणी कोविड सेंटर परवानगी

-बीएचएमएस व एमबीबीएस डॉक्टर शैक्षणिक कुवत नसताना रुग्णांवर करतात उपचार.

-डॉक्टरांकडून रुग्णाला नातेवाईकांना व रुग्ण नातेवाईकांकडून डॉक्टर मारहाण का होते.

-रुग्ण दाखल करून घेतानाच 50-60 हजाराचे डिपॉझीट घेतले जाते तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना दिला जात नाही.

– रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडीसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजन आणण्याची होत असलेली सक्ती

-रुग्णांच्या वैद्यकीय बिलांबाबत मनपाने नेमलेल्या ऑडिटर मंडळींना असहकार्य, त्यांना बसण्यासाठी साधी जागाही उपलब्ध करून दिली जात नाही.

-़हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला तर हॉस्पिटलच्या वा हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या रुग्णवाहिकांना मृतदेह अमरधामला नेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून पाहिजे तेव्हडे पैसे घेण्याची मुभा.

-वैद्यकीय उपचारांचे पैसे दिले नाही म्हणून मृतदेह अडवून ठेवण्याच्या 3 घटना.

-रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांची रुग्णाच्या नातेवाईकांना दिली जात नसलेली माहिती.

-हॉस्पिटलमधील मेडिकल दुकानांमधूनच ते लावतील त्या दरात गोळ्या घेण्याची सक्ती.

– बहुतांश सर्वच कोविड सेंटरला कोणतेही डॉक्टर स्वतःहून अ‍ॅडमिट पेशंटजवळ येऊन त्यांची कोणत्याही प्रकारची आरोग्य चौकशी कधीच करीत नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांनी खूप आरडाओरड केली वा एखाद्या राजकीय नेत्याचा वशिला लावला तरच रुग्णाकडे लक्ष दिले जाते.

त्याचीही माहिती लपवली जाते

खासगी हॉस्पिटल्समधून रुग्णांची आर्थिक लूट होते वा तेथे मृत्यूदर जास्त वाढले असल्याच्या चर्चा सगळीकडे होत आहेत व त्यावर चौकशीच्या मागण्याही होतात. या पार्श्‍वभूमीवर खासगी हॉस्पिटल्सने किती रुग्ण आतापर्यंत बरे केले, याची एकत्रित आकडेवारी हॉस्पिटलवाले वा इंडियन मेडिकल असोसिएशनची नगर शाखाही देत नाही. या पार्श्‍वभूमीवर बुथ हॉस्पिटल वा स्वयंसेवी संस्थांच्या कोविड सेंटरमधून बरे झालेल्या रग्णांना गुलाबाची फुले देऊन दिला जात असलेला निरोप ठळकपणे समाजासमोर येतो. खासगी रुग्णालयांतून अजूनपर्यंत एकदाही असे घडल्याचे प्रसिद्धीमाध्यमांतून दिसले नाही.

कडक कारवाईची मागणी

डॉक्टरांवर हल्ला करणार्‍या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देऊन करण्यात आली. नगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटल येथील आरोग्य अधिकारी राहुल ठोकळ यांच्यावर हल्ला करणार्‍या आरोपींवर ककड कारवाई करावी, अशी मागणी सिटी स्क्वेअर हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत संचालक डॉ.संदीप सुराणा यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुराणा म्हणाले की, रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात डॉक्टर ठोकळ यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांना 30 टाके पडले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS