कौतुकच अंगलट येतं तेव्हा…!

Homeसंपादकीयदखल

कौतुकच अंगलट येतं तेव्हा…!

आपल्या नेत्याच्या कामाचा अभिमान असायलाच हवा. त्याबाबत दुमत असण्याचं काहीच कारण नाही; परंतु नेत्याला हरभर्‍याच्या झाडावरही बसवू नये. कौतुक हे किळस वाटता कामा नये.

मतदान आणि आयोग !
सत्ताधारी जातवर्गाला सत्तेचे अपचन!
राफेलचं भूत पुन्हा मोदींच्या मानगुटीवर

आपल्या नेत्याच्या कामाचा अभिमान असायलाच हवा. त्याबाबत दुमत असण्याचं काहीच कारण नाही; परंतु नेत्याला हरभर्‍याच्या झाडावरही बसवू नये. कौतुक हे किळस वाटता कामा नये. वाचाळवीरांना कौतुक आणि किळसवाणेपणा याच्यातला फरक लक्षात येत नाही. त्यामुळं त्यांचं आणि त्यांच्या नेत्याचं हसू होतं. 

    कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं भारताची जगभर छी थू झाली. वैज्ञानिक नियतकालिकासह जगभरातील नामवंत वृत्तपत्रांच्या संपादकीयात कोरोनाच्या हाताळणीवरून टीका झाली. बेडस्ची वाणवा, औषधांचा काळाबाजार, ऑक्सिजनचा तुटवडा, व्हेंटिलेटरची कमतरता, पीएम केअरमधील व्हेंटिलेटरची निष्कृष्ठता, लसीकरणातील गोंधळ यावर टीका झाली. न्यायालयानं टीका केली. ताशेरे ओढले. यातही मोदी यांच्या कामाचं कौतुक कुणाला वाटत असेल, तर वाटो; परंतु त्यातून ज्यांचं कौतुक आपण केलं, त्याचं तर हसू होत नाही ना, हे पाहायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेताल वक्तव्य करू नका, अशी तंबी देऊनही भाजपचे नेते वाचाळता सोडायला तयार नाही. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणानं भाजपचे नेते वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून आता दीड वर्ष झालं असेल, तरी त्याचा उगम अजूनही वादात आहे. वुहानमधील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूचा उगम झाल्याचा संशय अजूनही आहे. वुहान प्रयोगशाळेतील तीन शास्त्रज्ञांना कोरोनाची लागण झाली होती, हे आता उघड झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं जरी चीनला ’क्लिन चीट’ दिली असली, तरी अजूनही चीनच्या प्रयोगशाळेतच त्याची निर्मिती झाली, यावर अनेक शास्त्रज्ञांचं ठाम मत आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी फेब्रुवारी ते मे पर्यंत अक्षरशः थैमान घातलेलं बघायला मिळालं. देशात रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. दररोज चार लाखांपर्यंत रुग्ण आढळत होते. सरासरी साडेचार हजार मृत्यू होतात. असं असतानाच भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमागं चीन असल्याचा दावा केला आहे. चीननं गेल्या वर्षभरात कोरोनावर नियंत्रण मिळविलं. तेथील मृत्यूदर कमी आहे. असं असताना आता चीनवर खापर फोडताना भाजपच्या या महासचिवांनी त्याचा संबंध पुन्हा चीनशी जोडला आणि त्याचं अतार्किक कारण दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं चीनला आव्हान देत आहेत आणि याचं प्रत्युत्तर म्हणून चीननं व्हायरल वॉर सुरू केलं आहे, असं विधान कैलास विजयवर्गीय यांनी केलं आहे. विजयवर्गीय म्हणाले, की कोरोनाची दुसरी लाट पसरली, की पसरवली गेली हा चौकशीचा विषय आहे. जगामध्ये कुणी चीनला आव्हान दिलं असेल, तर ते भारतानं आणि मोदी यांनी दिलं आहे. हा चीननं केलेला व्हायरल हल्ला आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भारताला संकटात टाकण्यासाठी चीननं हा व्हायरल हल्ला केला आहे, असं आम्हाला वाटतं. कारण भारतातच कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. ही लाट बांगला देश, पाकिस्तान, भूतान वा अफगाणिस्तानात पसरलेली नाही, असा जावईशोध त्यांनी लावला.

कोरोनाची दुसरी लाट भारतातच आली, असं नाही, तर ती जगभरात होती. युरोपात तर आता तिसरी लाट आहे. चीनचा मित्रदेश असलेल्या पाकिस्तानातही आता कोरोनाची दुसरी लाट आहे. याबाबत काहीही माहिती नसताना विजयवर्गीय यांनी, ’चीनचा हा व्हायरल हल्ला भारताच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी केलेला कटाचा भाग आहे. अशावेळी आपण देशासोबत एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे. आम्ही पक्षासाठी नाही, तर देशासाठी काम करत आहोत,’ असं त्यांनी म्हटलं. मोदी यांनी देशाला ऑक्सिजन तुटवड्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत. ऑक्सिजन संकट उद्भवलेलं असताना मोदी यांनी केलेल्या कामांची आपण कल्पनाही करू शकत नाही. नौदल, लष्कर आणि वायुदलाची मदत घेतली गेली. नौका, विमान आणि ट्रेनच्या मदतीनं ऑक्सिजनचे टँकर आणण्यात आले. सुरुवातीचे चार-पाच दिवस आपल्याला त्रास झाला. आम्हाला दुसर्‍या लाटेची तीव्रता आणि तिच्या परिणामांविषयी माहिती नव्हती, असंही विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. आपल्या नेत्याचं कौतुक करताना त्याचं तारतम्य ठेवलं पाहिजे. एखाद्याला हरभर्‍याच्या झाडावर चढविलं, तर तसं करणार्‍यांचं आणि ज्याच्या बाबतीत केलं, त्याचंही हसू होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधानं करू नका अशी तंबी खुद्द मोदी यांनी दिली असतानाही भाजपमधील काही नेत्यांची वादग्रस्तं विधानं सुरूच आहेत. या विधानांवरून देशभरात टीका होऊ लागल्यावर या नेत्यांना आपली विधानं मागं घ्यावी लागत आहेत. विजयवर्गीय यांच्या विधानातून त्यांचं अज्ञानच बाहेर आलं. कोरोनाची दुसरी लाट येण्याची कल्पना नव्हती, असं ते म्हणाले असले, तरी वेगवेगळ्या संस्था, शास्त्रज्ञांनी अगोदरच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची कल्पना दिली होती; परंतु पश्‍चिम बंगालच्या निवडणुका मोदी, विजयवर्गीय आणि अमित शाह यांच्यादृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या होत्या. त्यांच्यादृष्टीनं कोरोनाची लाट दुय्यम होती. आता तिच्या परिणामांची दाहकता दिसायला लागली आहे. जगभरातून टीका व्हायला लागली, न्यायालयं थपडामागून थपडा लावायला लागली, तेव्हा कुठं झोपेतून जागं झाल्यासारखं कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे परिणाम जाणवायला लागले. विजयवर्गीय यांनी प्रथमच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, असं नाही. वारंवार ते अशी वादग्रस्त वक्तव्यं करीत असूनही त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. ज्या पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती, त्या पश्‍चिम बंगालमधील अपयशावर आता स्थानिक भाजप नेतेच टीका करायला लागले आहेत आणि विजयवर्गीय यांनाच जबाबदार धरायला लागले आहेत.

अभिनेता शाहरूख खानबद्दल वादग्रस्त विधान करणार्‍या विजयवर्गीय यांना नंतर आपलं वक्तव्य मागं घ्यावं लागलं. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, असं सांगत आधीचं वक्तव्य मागं घेतलं. विजयवर्गीय यांनी शाहरूख खान भारतविरोधी असल्याचं म्हटलं होतं. मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तो काही निवडक लोकांच्या आंतरराष्ट्रीय समूहामध्ये सामील झाला असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरून देशभरात अनेकांनी विजयवर्गीय यांच्यावर टीका केली होती. जर देशात असहिष्णुतेचं वातावरण असतं, तर शाहरूख खानला अमिताभ बच्चन नंतर इतकी प्रसिद्धी मिळालीच नसती. मी केलेल्या ट्वीटचा काही लोकांनी चुकीचा अर्थ लावल्याचं त्यांनी म्हटलं होतं. निवडणुका लढण्यासाठी काँग्रेसकडं चेहराच नाही त्यामुळं आता काँग्रेसकडून चॉकलेटी चेहरे समोर आणले जात आहेत, अशी गरळ त्यांनी ओकली होती. प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. तसंच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर भाजपनं सातत्यानं काँग्रेसला टार्गेट केलं आहे. सुरुवातीला काँग्रेसवर घराणेशाहीवरुन टीका करण्यात आली. त्यानंतर आता थेट प्रियांका यांना लक्ष्य केलं जात आहे. खुद्द मोदी यांनाच या विजयवर्गीय यांनी अडचणीत आणलं होतं. देशभक्तीच्या मुद्दावरून पंतप्रधान मोदींप्रमाणं देशभक्ती करू नका, असा सल्ला विजयवर्गीय यांनी दिला आहे. ड्रग्जचा नशा करू नये असं सांगताना विजयवर्गीय यांनी युवकांना देशभक्तीचे धडे दिले. युवकांनी देशभक्तीच्या नशेत राहावं; मात्र देशभक्तीची नशा एवढी ही नसावी, की मोदी यांच्याप्रमाणं लग्नच नाही करायचं. विजयवर्गीय यांचं हे वक्तव्य मोदींवर टीका आहे, की त्यांचे कौतुक हे त्यांना कळलं नसलं, तरी जनतेला बरोबर कळलं. 

COMMENTS