देशभरासह राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत आहे.
मुंबई, नवीदिल्ली / प्रतिनिधीः देशभरासह राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत आहे. गेल्या २४ तासांत ८१ हजार ४६६ नव्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा टाळेबंदी लागणार का, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. देशात येत्या १५ ते २० दिवसांत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. देशातील कोरोनाचे संकट अतिशय भयानकपणे वाढत आहे. आगामी काळात दररोजच्या रुग्णसंख्या वाढीचा आकडा एक लाखांवर जाण्याची शक्यता आरोग्य क्षेत्राशी संबंधीत विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आयआयटी कानपूरचे प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही निरीक्षणे नोंद केली आहेत. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १५ ते २० दिवसांत रोज ८० हजार ते ९० हजार कोरोना रुग्णांची भर पडणार आहे. ही आकडेवारी यापेक्षाही जास्त असू शकते. नंतर काही दिवसांनी यात घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या सहा महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक नोंदवला आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने गेल्या काही महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी (२ एप्रिल)केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे ८१ हजार ४६६ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी 23 लाख तीन हजार 131 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख ६३ हजार ३६९ वर पोहोचला आहे. रिपोर्टनुसार, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही सहा लाख १४ हजार ६९९ आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत दीड लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर या संकटात दिलासादायक बाब म्हणजे एक कोटी १५ लाख २५ हजार ३९ लोकांनी कोरोनावर मात केली असून ही लढाई जिंकली आहे.
कोरोनाचा कहर सुरू असून दैनंदिन रुग्णांची संख्या नवा विक्रम रचत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह सामान्य मुंबईकरांच्या चिंतेतही भर पडली असून संसर्ग नियंत्रणाचे आव्हान कठीण होत चालले आहे. शहर उपनगरात गुरुवारी आठ हजार ६४६ रुग्णांची नोंद झाली असून १८ बळी गेले आहेत. बाधितांची संख्या चार लाख २३ हजार ३६० झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ७०४ झाला आहे. झोपडपट्ट्या व चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्स ८० असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६५० आहे. २४ तासांत रुग्णांच्या सहवासातील २७ हजार ११ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर आणि इतर संबंधित संस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. जास्तीत जास्त टेस्टिंग, स्क्रीनिंग, कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग, विलगीकरणीवर भर देण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना दिले आहेत. ज्या हिशेबाने रुग्ण वाढत आहेत, ते पाहता येत्या काही दिवसांत रोजच्या रुग्णवाढीचा आकडा एक लाखांच्याही पुढे जाण्याची भीती आहे. कोरोना विषाणूची मारक क्षमता जास्त असण्याबरोबरच लोकांकडून वाढत असलेली बेफिकिरी रुग्णवाढीचे मोठे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या कोरोना वेगाने फैलावत असल्याने लोकांनी विशेष जागरूक राहणे आवश्यक असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्राबाबत अधिक चिंता
सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांतून एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण येत आहेत. महाराष्ट्रात सर्वांत जास्त 62 टक्के इतकी रुग्णांची संख्या आहे. दिल्लीतील कोरोनाचे संकटही वाढत चालले आहे. या सर्व राज्यांना जास्त सतर्कता बाळण्यास सांगण्यात आले आहे.
मॉल्स, पब, बार, रेस्टॉरंट बंद
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने 11 एप्रिलपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय राजधानी लखनऊ येथील मॉल्स, पब, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी कोरोनामुळे गेल्या चोवीस तासांत एकही मृत्यू नोंदवला गेला नाही, त्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, अंदमान-निकोबार, दादरा नगर हवेली, बिहार, मिझोराम, सिक्कीम, लडाख, लक्षद्वीप, नागालँड, त्रिपुरा यांचा समावेश आहे.
COMMENTS