कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत  दहा पोलिसांचा झाला मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत दहा पोलिसांचा झाला मृत्यू

कोरोना काळात बंदोबस्तावर असलेल्या जिल्हा पोलिस दलातील अनेक कर्मचार्‍यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली होती.

अहमदनगर जिल्ह्यात तरूणाची निर्घृण हत्या  
मिटके यांनी डिग्रस प्रकरणात खाकी वर्दीचा अभिमान उंचावला -हरजितसिंह वधवा
महापुरुषांच्या प्रतिमा डोक्यावर घेण्यापेक्षा विचार डोक्यात घ्या – प्रा. मंगलताई खिंवसरा

अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोना काळात बंदोबस्तावर असलेल्या जिल्हा पोलिस दलातील अनेक कर्मचार्‍यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली होती. यापैकी बरेचजण उपचारानंतर बरे झाले. पण दुर्दैवाने यामध्ये आतापर्यंत 15 पोलिसांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक 10 मृत्यू कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये झाले आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे.

    मार्च 2020 मध्ये करोनाचे सावट आले. 22 मार्च 2020 रोजी सरकारने जनता कर्फ्यूचे आवाहन केले. त्या दिवसापासून जिल्हा पोलिस दलातील सुमारे तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. पहिल्या लाटेमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी लोकांच्या होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांवर होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करणे, रुग्णालय परिसरात बंदोबस्त करणे आदी कामे पोलिसांवर होती. पहिल्या लाटेनंतर अनलॉक झाले. यानंतर पोलिसांवरील भार काहीसा हलका झाला. फेब्रवारी 2021मध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली. या लाटेमध्ये करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. शासनाने लॉकडाऊन घोषित केला तरीही लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. यामुळे नाकाबंदीच्या वेळी पोलिसांचा संपर्क थेट लोकांशी येत होता. रुग्णालयांवर अधिकचा ताण आल्याने लोकांनी रुग्णालय परिसरात गोंधळ घालण्याच्या तक्रारी वाढल्या. त्याठिकाणी पोलिसांना बंदोबस्तासाठी नेमावे लागले. अगदी अमरधाम येथेही पोलिसांना ड्युटी लागली. या सर्वांमध्ये अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. सुदैवाने दुसर्‍या लाटेच्या वेळी कोरोना लस आल्याने तात्काळ पोलिसांचे लसीकरण करण्यात आले. यामुळे अनेकांना संसर्ग झाला तरी त्रास झाला नाही. तरीही जानेवारी ते मे या कालावधीत जिल्हा पोलिस दलातील 10 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या 15 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये सहायक फौजदार- 4, पोलिस हवालदार- 7, महिला पोलिस हवालदार- 1, पोलिस नाईक- 2 व पोलीस शिपाई-1 यांचा समावेश आहे. शासनाकडून त्यांच्या कुटुंंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS