सर्वोच्च न्यायालयाने कुराणातून 26 आयाती हटवण्यासंबंधी दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका फेटाळून लावली आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कुराणातून 26 आयाती हटवण्यासंबंधी दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका फेटाळून लावली आहे. सोबतच, अशी याचिका दाखल करणार्या याचिकाकर्त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायमूर्ती फली नरीमन, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली.
ही याचिका वास्तविकतेत ’तुच्छ’ असल्याचे न्यायालयाने आपल्या सुनावणीत म्हटले. शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. कुराण शरीफमधून हिंसेचे आणि दहशतवादाचे शिक्षण देणार्या 26 आयती काढून टाकण्यात याव्यात, अशी मागणी वसीम रिझवी यांनी आपल्या याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर शिया आणि सुन्नी मुस्लीम समाजाने नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नाही, तर लखनऊमध्ये तयार करण्यात आलेली वसीम रिझवी यांची ’हयाती कब्र’ही तोडण्यात आली होती. तसेच वसीम रिझवी यांच्या मृत्यूनंतर कोणत्याही कब्रस्तानात दफन करण्यासाठी त्यांना जमीन दिली जाणार नाही तसेच कोणताही मौलाना त्यांच्या ’जनाजा’चे ’नमाज पठण’ करणार नाही, अशी घोषणाच लखनऊमध्ये झालेल्या एका धार्मिक संमेलनात मुस्लिम धर्मगुरुंनी केली होती.दरम्यान, याचिकाकर्ते वसीम रिझवी सध्या फरार आहेत. याचिका दाखल केल्यानंतर पत्नी, मुले आणि भावानेही आपली साथ सोडल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या एका व्हिडिओत म्हटले होते.
COMMENTS