भारतीय जनता पक्षाचं आव्हान परतवून लावायचं असेल, तर भाजपच्या विरोधातील पक्षांनी एकत्र यायला हवं.
भारतीय जनता पक्षाचं आव्हान परतवून लावायचं असेल, तर भाजपच्या विरोधातील पक्षांनी एकत्र यायला हवं. गेल्या बर्याच दिवसांपासून त्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसनं खरंतर त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता; परंतु काँग्रेसनं ते केलं नाही. शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर राव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला; परंतु काँग्रेसनं आता उशिरा का होईना पश्चिम बंगालमधून माघार घेतली.
गेल्या दोन महिन्यांपासून चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक सुरू होती. आता पश्चिम बंगालमधील निवडणुकीचेे दोन टप्पे राहिले आहेत. काँग्रेसनं आसाम आणि केरळ अशा दोन राज्यांत जेवढं लक्ष दिलं, तेवढं अन्य राज्यांत दिलं नाही. त्यातही पश्चिम बंगालच्या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या आहेत. भारतीय जनता पक्षानं कोणत्याही परिस्थितीत वंगभूमी ताब्यात घ्यायचा चंग बांधला आहे. साम, दाम, दंड, भेद अशा सर्वंच सूत्रांचा वापर त्यासाठी केला जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळालं, त्यावरून पश्चिम बंगालमध्ये खरी लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्येच होणार, यात कोणतीही शंका नव्हती. गेल्या पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या; परंतु लोकसभेच्या जागांचा कल आणि भारतीय जनता पक्षानं तिथं लावलेला जोर पाहिला, तर भाजपला शंभर जागा मिळतील, असं कुणीही सांगू शकत होतं. त्यामुळं तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फोडतोड केली. 25-30 आमदार, काही खासदार गळाला लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन महिने जणू राजधानी कोलकात्त्यालाच हलविली होती. सत्ता, निवडणूक आयोग, पैसा या सर्वांचा वापर भाजप करीत होता. ममतांचे वजनदार सहकारी त्यांना सोडून गेले. काहींच्या विरोधात चौकशीचं शुक्लकाष्ठ लागलं. अशा परिस्थितीत ममतांपुढं अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच नंदीग्राममध्ये त्यांच्या पायाला दुःखापत झाली. त्यावरही भाजपच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर येऊन भाष्य केलं. ममतादींनीनी संपूर्ण प्रचार व्हीलचेअरवरून केला. ममतांच्या मदतीला अखिलेश यादव, तेजस्वी यादव जाऊन आले. शरद पवार यांनी जायचं ठरविलं होतं; परंतु रुग्णालयात दाखल व्हावं लागल्यानं त्यांना जाता आलं नाही; परंतु पवार-ठाकरे यांनी त्यांचं मनोधैर्य वाढविलं. खरंतर डावे आणि काँग्रेसची पश्चिम बंगालमधील स्थिती वाईट झाल्यानं भाजपचं फावलं. तृणमूल काँग्रेसलाही वाटत होतं, की डावे आणि काँग्रेसचं बळ वाढावं; परंतु तसं झालं नाही. हे दोन पक्ष थोडे बळकट झाले असते, तर भाजप वाढला नसता.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात डावे, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आले असते, तर कदाचित भाजपचं आव्हान पेलता आलं असतं; परंतु या तीन पक्षांच्या एकत्रिकरणाचा भाजपनं वेगळाच फायदा उठविला असता, अशी भीतीही होती. मतांचं विभाजन कुणाच्या फायद्याचं याचा विचार केला गेला. सुरुवातीला मतविभाजन झालं, तर त्याचा फायदा आपल्याला होईल, असं तृणमूल काँग्रेसला वाटत होतं; परंतु नंतर निवडणूक एवढी रंगतदार होत गेली, की डावे आणि काँग्रेसच दखलपात्र नाही, असं चित्र तयार होत गेलं. केरळ आणि आसामध्ये सभा घेणार्या काँग्रेसनं पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधी यांची अवघी एकच सभा घेतली. कोरोनामुळं नंतर राहुल गांधी यांनी सभाच रद्द केल्या. राहुल बाधित आढळले. प्रियंका यांच्या पतीला कोरोना झाल्यानं त्यांनीही दौरे रद्द केले. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या नाकीनऊ आणले. सुरुवातीला शंभर जागा जिंकेल असं वाटणार्या भाजपनं नंतर मात्र सत्ता परिवर्तन करू शकतो, असं वातावरण तयार केलं. अशा परिस्थितीत भाजपला रोखायचं असेल, तर प्रादेशिक पक्ष असलेल्या तृणमूलला मदत करावी लागली, तरी चालेल, असा विचार काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेला दिसतो. त्यामुळं तर त्यांनी आता निवडणुकीचे दोन टप्पे राहिले असताना ममतादीदींशी चर्चा करून निवडणुकीतून पूर्ण माघार घेतल्याचं ठरविलेलं दिसतं. प्रचारच करायचा नाही आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणारी मतं तृणमूल काँग्रेसकडं वळविण्याचा हेतू दिसतो. त्यात किती यश येतं, हे निवडणुकीनंतरच कळणार असलं, तरी तृणमूल आणि काँग्रेसनं जागावाटप करून अगोदरच भाजपचा एकत्रित सामना केला असता, तर कदाचित भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यातला त्यांचा प्रामाणिकपणा मतदारांना भावला असता. गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून आता काँग्रेसनं पूर्णपणे माघार घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपण आता पश्चिम बंगालमध्ये एकही सभा घेणार नसल्याचं जाहीर केलं होतं. देशात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्यामुळं काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात असलं, तरी खरं कारण भाजपच्या विजयाचा वारू किमान आता दाखविलेल्या शहाणपणामुळं तरी रोखता येईल, असं त्यांना वाटत असावं. सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी दूरध्वनीवरुन यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसनं पश्चिम बंगालमधील प्रचार जवळपास थांबवला आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांतील 69 जागांसाठी अद्याप मतदान व्हायचं बाकी आहे; मात्र या दोन्ही टप्प्यात काँग्रेसकडून आता फारसा प्रचार होणार नाही. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रमुख लढत ही भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्येच रंगणार आहे. काँग्रेस आणि डाव्यांना तिथं फारशी संधी नाही. त्यामुळं उगीच आपल्यामुळं भाजपच्या विजयाला आपला अप्रत्यक्ष हातभार लागणार नाही, याची काळजी काँग्रेसनं घेतलेली दिसते. पवार यांनी जेव्हा पश्चिम बंगालच्या दौर्यावर जायचं घोषित केलं, तेव्हा काँग्रेसनं त्यांच्या दौर्याला विरोध केला होता. पवार पश्चिम बंगालमध्ये गेल्यानं लगेच काही निवडणुकीचं वारं फिरणारं नव्हतं; परंतु देशात एक संदेश गेला असता. त्यातून त्यांना बळ मिळालं असतं; परंतु तेव्हा काँग्रेसनं माती खाल्ली आणि आता तिला शेवटच्या टप्प्यांत शहाणपण आलं. 69 जागांवर जरी भाजपविरुद्ध सर्व असं चित्र दिसलं, तरी तृणमूल काँग्रेसला त्याचा फायदा मिळाला, तर या शहाणपणाचा उपयोग झाला, असं म्हणता येईल.
COMMENTS