महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने महापौर व उपमहापौरपदासाठीचे कोरे अर्ज नेल्याने त्यांची उमेदवारी होणार काय, याची उत्सुकता होती.
अहमदनगर/प्रतिनिधी- महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने महापौर व उपमहापौरपदासाठीचे कोरे अर्ज नेल्याने त्यांची उमेदवारी होणार काय, याची उत्सुकता होती. पण ती फुसली ठरली. काँग्रेसच्या उमेदवार शीला शिंदे महापालिकेत फिरकल्याच नाहीत. परिणामी, शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे व राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांचेच अर्ज अनुक्रमे महापौर व उपमहापौरपदासाठी राहिल्याने त्यांच्या निवडी मंगळवारीच (29 जून) बिनविरोध झाल्या. आता बुधवारी (30 जून) या दोन्ही निवडींसाठीच्या सभेत या निवडींची अधिकृत, पण आता औपचारिकता राहिलेली घोषणा पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले करणार आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या यंदाच्या महापौरपदासाठी भाजपकडे उमेदवारच नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्येच उमेदवारीसाठी रस्सीखेच होती. यातही सेनेकडे तीन नगरसेविका असताना दोघींनी माघार घेतली व राष्ट्रवादीच्या उमेदवाराने काही दिवस प्रयत्न केल्यावर डाळ शिजत नसल्याचे पाहून चर्चेत येणेच थांबवले. त्यामुळे शिवसेनेकडून रोहिणी शेेंडगे व काँग्रेसकडून शीला चव्हाण यांच्यातच चुरस होती. शेंडगेेंनी सोमवारीच महापौरपदाचा अर्ज घेऊन तो भरून टाकला. तर चव्हाण यांनी फक्त महापौर-उपमहापौरपदाचे कोरे अर्ज ताब्यात घेतले. मंगळवारी राष्ट्रवादीने उपमहापौरपदासाठी इच्छुक गणेश भोसले, मीना चोपडा व विनित पाऊलबुद्धे यांच्यात समेट घडवला व भोसलेंचे नाव अंतिम करून त्यांचा उमेदवारी अर्जही भरला. त्यानंतर काँग्रेसच्या चव्हाण यांचे अर्ज येतात काय, याची प्रतीक्षा होती. त्यांचे पती दीप चव्हाण मुंबईत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तळ ठोकून होते. थोरातांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. पण या चर्चेलाही यश आले नाही. परिणामी, चव्हाण यांचे अर्ज आले नाही व रिंगणात शेंडगे आणि भोसले यांचेच अर्ज राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले.
तेव्हा नव्हते, आता होते
मनपात काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. यापैकी शीला चव्हाण या उमेदवारी करण्यास इच्छुक होत्या. त्यामुळे शिवसेनेचा महापौरपदाचा अर्ज भरतेवेळी अन्य चार नगरसेवक अनुपस्थित होते. मात्र, मंगळवारी राष्ट्रवादीचा उपमहापौरपदाचा अर्ज भरण्याच्यावेळी हे चारही नगरसेवक उपस्थित होते. तेव्हा नसलेल्या व आता असलेल्या त्यांच्या उपस्थितीची तसेच यानिमित्ताने स्थानिक महाविकास आघाडीत काही बेबनाव आहे काय, याचीही चर्चा महापालिकेत होती.
असे पहिले, तर तसे तिसरे
महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यादा महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज न आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्थात मनपाच्या इतिहासातील ही तिसरी बिनविरोध निवडणूक आहे. याआधी 2012 मध्ये शिवसेनेच्या शीला शिंदे यांच्या विरोधात काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर यांनी दाखल केलेला अर्ज मतदानाआधी मागे घेतल्याने शिंदे बिनविरोध महापौर झाल्या तर 2016 मध्ये सेनेच्या सुरेखा कदम यांच्याविरोधात अर्ज दाखल केलेल्या भाजप उमेदवार नंदा साठे यांनी माघार घेतल्याने कदम बिनविरोध महापौर झाल्या. 2021 मध्ये म्हणजे आता विरोधकांचे अर्ज न आल्याने शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमहापौर बिनविरोध झाला आहे. अर्थात महाविकास आघाडी एकत्र आल्याने विरोधक झालेल्या भाजपकडे या प्रवर्गातील नगरसेविकाच नसल्याने त्यांच्या उमेदवारीचा प्रश्नही नव्हता.
COMMENTS