टिपू सुलतानांचे शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्षबुलडाणा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यात र

टिपू सुलतानांचे शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष
बुलडाणा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे शौर्य आणि स्वराज्याचा विचार रुजवला, त्याच धर्तीवर टिपू सुलतान यांनीही इंग्रजांविरुद्ध लढा दिला, त्यामुळे त्यांना शौर्याच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले जावे, असे मत सपकाळ यांनी व्यक्त केले, त्यांच्या या वक्तव्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सपकाळ बुलडाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना उभी केली आणि परकीय सत्तेविरोधात संघर्ष केला. त्याचप्रमाणे अनेक वर्षांनंतर टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध झुंज दिली. त्या अर्थाने तेही परकीय सत्तेविरोधात उभे राहिलेले योद्धे होते, असे त्यांनी नमूद केले. शौर्य आणि संघर्ष या निकषांवर इतिहासातील व्यक्तींकडे पाहिले पाहिजे, असेही त्यांनी जोडले. अलीकडेच मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून वाद निर्माण झाला होता. त्या वादाची धग अजून शमलेली नसतानाच सपकाळ यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. इतिहासातील व्यक्तिमत्त्वांच्या भूमिकेचा संदर्भ देताना संवेदनशीलता राखली पाहिजे, अशी मागणी काही राजकीय नेत्यांकडून होत आहे. याच पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. अलीकडेच एका शासकीय कार्यालयात लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एखाद्या छोट्या प्रकरणावर कारवाई करून जबाबदारी संपत नाही; मोठ्या स्तरावरील गैरव्यवहारांवरही कठोर पावले उचलली पाहिजेत, असे ते म्हणाले. सरकारच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलताना सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत परिस्थितीवरही भाष्य केले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत त्यांनी पक्षाची दिशा आणि निर्णयप्रक्रिया याबाबत प्रश्न उपस्थित केले. पक्षाच्या धोरणांवर कोणाचा प्रभाव आहे, हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी ः मुख्यमंत्री फडणवीस
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच टिपू सुलतान यांनाही समान सन्मान दिला जावा, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे. फडणवीस यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करून जनतेला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त केले आणि रयतेच्या कल्याणासाठी राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याचा इतिहासात स्वतंत्र आणि विशेष ठसा आहे. अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची तुलना टिपू सुलतान यांच्याशी करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS