Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्डिले-तनपुरे…आता पुरावे द्यायला पुढे या..

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येनंतर भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाल्याने तो चर्चेचा विषय आहे.

शिर्डी येथील पाळणा अपघातातील साळवे कुटुंबास 50 हजारांची मदत
पाथर्डीतील खुनाच्या गुन्ह्यातील 10 आरोपी अवघ्या 12 तासात जेरबंद
नगरच्या श्रीविशाल गणपतीला चांदीची रत्नजडित अंगठी

अहमदनगर/प्रतिनिधीः राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येनंतर भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाल्याने तो चर्चेचा विषय आहे. या पार्श्‍वभूमीवर आता राहुरी पोलिसांनी दातीर खून प्रकरणाशी संबंधित काही पुरावे वा कागदपत्रे कोणाकडे असल्यास, ते पोलिसांना देण्याचे आवाहन केल्याने आता माजी आमदार कर्डिले व मंत्री तनपुरे कधी राहुरी पोलिसांत जाऊन त्यांच्याकडे या घटनेबाबत असलेले पुरावे देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दातीर यांची सहा एप्रिलला अपहरण करून हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुरीतील महामार्गालगतच्या 18 एकर जागेच्या वादातून दातीर यांची हत्या झाल्याचे समजते. या पार्श्‍वभूमीवर कर्डिले यांनी मंत्री तनपुरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शेतकर्‍यांच्या खासगी मालकीच्या जागेवर राहुरी नगरपालिकेने आरक्षण टाकले व ते तनपुरे यांनी उठवून तेथे त्यांच्या मुलाच्या नावाने व्यवसाय सुरू केला आणि यात त्यांच्या मेव्हण्याची भागीदारी असल्याचा आरोप केला आहे. तसे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे; मात्र त्यांचे हे आरोप मंत्री तनपुरे यांनी फेटाळून लावताना, कर्डिले यांचा राजकीय प्रवासच गुन्हेगारीतून सुरू झाल्याचा आरोप करून, राहुरीतील त्या जागेशी मुलाचा वा तनपुरे परिवाराचा संबंध नाही, असेही स्पष्ट केले आहे. कर्डिलेंकडे याबाबत काही पुरावे असतील तर त्यांनी तातडीने ते पोलिसांना देण्याचे आव्हानही दिले आहे. कर्डिले यांनी अशा राजकीय खेळ्या करण्यापेक्षा राहुरीच्या विकासावर बोलण्याचा सल्ला दिला आहे. कर्डिले व तनपुरे यांच्यात दातीर यांच्या हत्येच्या प्रकरणावरून रंगलेला हा कलगीतुरा आता राजकीय न राहता पोलिसांच्या तपासाचा भाग बनण्याची चिन्हे आहेत. कर्डिले यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पुरावे दिल्याचे सांगितले आहे, तर पोलिसांसमोर आपली बाजू मांडण्याचे तनपुरे यांनीही जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर हे दोघे त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे व पुरावे राहुरी पोलिसांना कधी देतात, याची उत्सुकता आहे तसेच पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना, या दोघांशिवाय राहुरी वा अन्य ठिकाणचे कोणी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे पोलिसांना देतात काय व ती काय असतील, याची उत्सुकता वाढली आहे.

पुरावे देणार्‍याचे नाव ठेवणार गोपनीय

पत्रकार रोहिदास राधुजी दातीर (वय-49) यांचे अपहरण व त्यानंतर त्यांचा खून झाल्याबाबत राहुरी पोलिस ठाणे गुन्हा रजि.नं. 286/2021 भादवि कलम 302, 363, 364, (ब) 201 प्रमाणे दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने कोणत्याही व्यक्तीस कोणताही पुरावा अथवा पुरावा म्हणून कोणताही दस्तऐवज, अभिलेख किंवा काही कागदपत्रे पुराव्याच्यादृष्टीने सादर करावयाची असतील, तर त्यांनी राहुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याशी फोन नंबर 02426-232433 अथवा मोबाईल नंबर 9423583955 या फोनवर संपर्क साधावा. माहिती देणार्‍या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन राहुरी पोलिसांनी केले आहे.

COMMENTS