ऑक्सिजन प्लान्टच्या  ठिकाणी आता संचारबंदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑक्सिजन प्लान्टच्या ठिकाणी आता संचारबंदी

जिल्ह्यातील पाच ऑक्सिजन प्लान्टच्या परिसरातील 100 मीटर हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
अतिक्रमणांवर पडतोय हातोडा… रस्त्यांचा श्‍वास होतोय मोकळा..
राहाता शहरात अतिक्रमणविरोधी मोहीमेला वेग

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्ह्यातील पाच ऑक्सिजन प्लान्टच्या परिसरातील 100 मीटर हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या वैद्यकिय उपचारासाठी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यामुळे अनेकजण जिल्हा सामान्य रुग्णालय व इतर ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन स्टोअरेज-रिफिलर प्लान्टच्या ठिकाणी गर्दी करत वाद घालीत असल्याचे निदर्शनास आले असल्याने या परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्यातील पाचही ऑक्सिजन प्लान्टच्या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी नगर भाग हद्दीतील या पाच ऑक्सिजन स्टोअरेज-रिफिलर प्लान्टच्या 100 मीटर परिसरात संचारबंदी जारी केली आहे. प्राधिकृत व्यक्ती व कर्मचार्‍यांखेरीज इतरांना या परिसरात येण्यास सक्त मज्जाव करण्यात आला आहे. सध्या कोरोना संक्रमणाचे मोठे प्रमाण जिल्हयात वाढले आहे. बाधितांची संख्या मोठी असल्याने कोविड रुग्णालये व सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेक कोरोना संक्रमित रुग्णांवर ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी ऑक्सिजनची दैनंदिन गरज भागविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशात पाठपुरावा सुरूच आहे. या पाठपुराव्यामुळे दररोज टँकरद्वारे ऑक्सिजन उपलब्ध करण्यात काही प्रमाणात यश येत आहे. जिल्हयातील ऑक्सिजन स्टोअरेज-रिफिलर प्लान्टमधून वैद्यकिय उपचारासाठी समन्वय राखीत रुग्णालयांना ऑक्सिजन देण्यात येतो आहे. मात्र, अनेकदा प्लान्टच्या ठिकाणी ऑक्सिजनच्या मागणीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यातून वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे संबंधित प्लान्टच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उपाययोजना करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार ऑक्सिजन प्लान्टच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नगर उपविभाग हद्दीत असलेल्या ऑक्सिजन प्लान्ट परिसरात प्राधिकृत व्यक्ती व प्लान्टमधील कर्मचार्‍यांखेरीज इतरांच्या संचारास प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सक्त मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणे महाग पडणार आहे. त्यामुळे आता ऑक्सिजन प्लान्टच्या ठिकाणी 100 मीटर परिसरात येण्यास, उभे राहण्यास, वाहन आणण्यास आता प्राधिकृत व्यक्तीखेरीज इतरांना बंदी राहाणार आहे तसेच खासगी रुग्णालयांनी या कामासाठी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर संबंधित प्लान्टचालक व पोलिसांना देणे या आदेशान्वये अनिवार्य करण्यात आले आहे.

COMMENTS