राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत.
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसह इतर औषधांचा तुटवडा जाणवत आहेत. मुंबईसह राज्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत, तर दुसरीकडे ऑक्सिजन प्लांट उभारायला महापालिकेकडूनच दुर्लक्ष झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हजारो नातेवाईक तक्रारी करत आहेत. मुंबईतील बोरिवलीमधील भगवती रुग्णालय आणि गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णांना चक्क कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे; पण मुंबई महापालिकेच्या 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा प्रस्तावाच्या फाईलवर आरोग्य विभागाचे अधिकारी अडून राहिले आहेत. गेल्या वर्षभरापासून सर्व उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याची मागणी होत आहे; पण याकडे आरोग्य विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन उपनगरीय रुग्णालयांमधील रुग्णांना ऑक्सिजनअभावी अन्य कोविड केंद्रात हलवण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. या घटनेमुळे कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेची सर्वच स्तरावर बदनामी होत आहे. मुंबई महापालिकेच्या विशेष रुग्णालयांपैकी कस्तुरबा रुग्णालय आणि जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आले आहेत. याच धर्तीवर उर्वरीत 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा निर्णय गेल्या वर्षांपासून प्रलंबित आहे. महापालिका आयुक्तांकडून हे प्लांट बसवण्यास मंजुरीही देण्यात आलेली आहे.
COMMENTS