खान ड्रग्ज प्रकरणाचे महाभारत राजकारणातील सत्तेच्या धर्मयुध्दाला धुनी देऊ लागल्याने राजकीय पक्षांचे मुखवटे टरटरा फाटू लागले आहेत.जनमानसात असलेली रा
खान ड्रग्ज प्रकरणाचे महाभारत राजकारणातील सत्तेच्या धर्मयुध्दाला धुनी देऊ लागल्याने राजकीय पक्षांचे मुखवटे टरटरा फाटू लागले आहेत.जनमानसात असलेली राजकारण्याची प्रतिमा चव्हाट्यावर येऊ लागली आहे.नैतिकता कोळून प्यालेल्या चित्रपट सृष्टीतील खान कृत्याचे समर्थन राज्यातील सरकारमध्ये प्रमुख असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासारख्या नेत्यांकडून होऊ लागल्याने अनैतिक संस्कृतीचा उध्दार कळतनकळत नेतेमंडळींकडून होतो आहे.गेल्या आठ दहा दिवसांपासून केवळ एकच पक्ष किंबहूना एकच नेता या प्रकरणावर भाष्य करतांना दिसतो आहे. सरकारमध्ये सामील असलेला काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे मित्रपक्ष मौन बाळगून आहेत.
खान कुटूंबाबाबत या विशिष्ट मंडळींनाच का असा प्रश्न श्रेष्ठींना पडत नसेल का? त्याचा शोध ही मंडळी घेणार की नाही?साधारण दोन पावणे दोन वर्षापुर्वी राज्यात झालेल्या त्या पावसात भिजलेल्या एका नेत्याच्या करिश्माने विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मतांचा वर्षाव झाला.गारपीट व्हावी आणि त्यात बलाढ्य पोसलेल्या पक्षाची अवकळा व्हावी असाच काहीसा चमत्कार त्यावेळी झाला.आणि राज्यात राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा खर्या अर्थाने उंचावली.मतदारांनी अनेक वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर दाखवलेला विश्वास या निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरला.भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी मतदारांची मानसिकता विखूरलेल्या स्थितीत का होईना भाजपविरोधी आहे असा सकारात्मक सुप्त संदेश शरद पवारांनी हेरून बदलत्या प्रवाहाचा राजकीय फायदा उठविण्यासाठी चाणाक्ष निती तयार केली.राजकीय अभ्यासकांच्या मते हीच ती चाणक्य निती.एरवी कुठल्याही परिस्थितीत एकमेकाकडे न पाहणारे राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना या दोन राजकीय पक्षांना सत्तेच्या वळकुटीत बांधण्यासाठी शिष्टाई करून ऐतिहासिक सरकार स्थापन केले,तथापी सरकारमधील काही मंडळींच्या फाजीलपणामुळे सरकारचीच नितीमत्ता लोकशाहीच्या वेशीवर टांगली गेली.या सरकारचे पहिलेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटीच्या प्रकरणाने राष्ट्रवादीच्या प्रतिमेचा उंचावलेला आलेख घसरू लागला.त्यातच आर्यन प्रकरणात आणखी एक मंत्री तथा पक्षाचे प्रवक्ते राज्याची इभ्रत चव्हाट्यावर आणणाऱ्या प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या चित्रपट सृष्टीतील आर्यनचे समर्थन करू लागल्याने घसरत असलेला आलेख घरंगळू लागला. राज्यातील एका जबाबदार पक्षाच्या, एका जबाबदार अधिकृत प्रवक्त्यांनी अशा गोष्टींचे समर्थन का करावे? या मुद्यावर उलट-सुलट चर्चेला राज्यभर उधाण आले आहे. पक्षाचे प्रवक्ते जे बोलतात ती त्या पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते. नवाब मलिक आर्यनच्या या कृत्याचे समर्थन करीत नाहीत तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्षच त्याचे समर्थन करीत होता, असा त्याचा सरळ अर्थ होतो. परंतू यामुळे राज्यात राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर घसरली.अशी चर्चा चावडीचावडीवर ऐकायला येऊ लागली तर आश्चर्य नाही. गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून गल्ली पासून दिल्लीच्या माध्यमांमध्ये एकच विषय चघळला जात आहे,समाजातील सारे प्रश्न मिटले आहेत,केवळ मन्नत,आरौयन खान आणि नवाब मलिक हे तीनच गंभीर मुद्दे देशासमोर आहेत अशी वातावरण निर्मिती माध्यमांमधून सुरू आहे.क्रुझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आयर्न खान आणि त्याच्या सोबत असलेले त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि फॅशन डिझायनर मुन मुन धामेचा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आणि त्याच सोबत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना ही दिलासा मिळाला असून अटक करण्यापुर्वी तीन दिवस आधी समीर वानखेडे यांना नोटीस द्यावी.या आदेशावर सरकारनेही हमी भरली आहे. 25 दिवस कारागृहा मधला मुक्काम संपवून आर्यन खान मन्नत या आपल्या घरी आला आहे. या 25 दिवसात देशात 11 महिने ऊन, वारा, पाऊस या सर्व नैसर्गिक आपत्तीला तोंड देत तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आपली मागणी मान्य व्हावी यासाठी देशाच्या राजधानीच्या वेशीवर ठाण मांडून बसला आहे. अशा गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आणि जणू काय देशातील आणि राज्यातील सर्व प्रश्न संपले की काय अशा पध्दतीने फक्त आर्यन खान, समीर वानखेडे आणि नवाब मलिक या तीन व्यक्ती भोवतीच देशभरातील विविध चॅनल आणि सोशल मीडिया ने देशातील सर्व जनतेला वेठीस धरले होते. या तीन व्यक्तींपुढे देशातील प्रश्न दुय्यम आहेत. असे चित्र निर्माण करण्याचे काम या मंडळींनी केले. एकीकडे नवाब मलिक यांनी समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबांवर ओरखाडे ओढण्याची एकही संधी सोडली नाही. समीर वानखेडे हे खरे की खोटे हा संशोधनाचा मुद्दा आहे खरेतर.मंत्री पातळीवर तेही जाहीर व्यासपीठावरून प्रशासनातील एखाद्या अधिकारी पदावरील व्यक्तीचे वाभाडे निघत असतील तर ते आपल्या संस्कृतीला शोभत नाही.मंत्र्याने वर्दी उतरविण्याची जाहीर धमकी देणे ,जातीवर अणि धर्मावर प्रश्न चिन्ह लावणे या गोष्टी महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसतात का?याचाही विचार जणतेपणाने व्हायला हवा. ही आदळ आपट करणारे नवाब मलिक यांच्या जावायाला याच समीर वानखेडेंनी एका ड्रग प्रकरणात सहा महिने जेलमध्ये टाकले होते, तर मग इतकी आदळ आपट करण्यास नवाब मलिक यांनी तेव्हा तोंड का उघडले नाही. उशीर का केला? समीर वानखेडेची जात वेगळी आहे, धर्म वेगळा आहे, त्यांची आई मुस्लीम आहे, त्यांचे सगळे कुटुंब बोगस आहे, असे आरोप करून समीर वानखेडेच्या खाजगी जीवनात ढवळा ढवळ करण्याची एवढे घाई करण्याची एका जबाबदार मंत्र्याला खरोखर गरज आहे का? महाराष्ट्रात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत त्या बाबतीत नवाब मलिक विधानसभेत कधी इतके हातघाईवर आल्याचे दिसले नाहीत. समीर वानखेडे हाच महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न आहे आणि तो मी सोडविणारच अशी जणू नवाब मलिकांनी शपथ घेतली की काय? मग त्यांनी मंत्रीपदाची पण शपथ घेताना कोणत्याही समाजाबद्दल राग, द्वेष, लोभ न ठेवता मी माझ्या पदाशी प्रामाणिक राहून निष्ठेने काम करेन अशी शपथ घेताना राज्यपालांसमोर घेतली होती, त्या शपथेचे काय? नवाब मलिक यांनी एका मुलाखतीत सांगितले की वर्दी जबाबदारीने पेलवायची असते, वर्दीला कायद्याची नियमांची चौकट असते, मग नवाब मलिक मंत्री आहेत त्यांना कायद्याची व नियमांची चौकट नसते का? खरे तर या ड्रग प्रकरणाचा धुराळा उडत असताना त्यांच्या पक्षाचे पितामह भीष्म यांनी या बाबतीत काहीच प्रतिक्रिया दिली नाही, हे विशेष. आणि त्यांच्याच पक्षाच्या धृतराष्ट्रांनी सुद्धा या प्रकरणात डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात तसाच काहीसा मिळता जुळता प्रकार या प्रकरणाच्या बाबतीत होत आहे. महाभारतातील भर दरबारात द्रोपदी वस्त्र हरण होत असताना पितामह भीष्म अणि धृतराष्ट्र यांनी या प्रसंगात हस्तक्षेप केला नाही. आणि त्याचा परीणाम काय झाला हे येथे सांगण्याची गरज नाही. या प्रकरणी समीर वानखेडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना या प्रकरणात मराठी महिलेला साथ दया, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे. पण या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरें काहीही बोलत नसल्याने मुंबई सारख्या महानगरात राहणार्या मराठी जनतेत काय संदेश गेला? हे मी विधवा होईल चालेल पण सवत मेली पाहीजे ही म्हण नवाब मलिकांना बरोबर लागू पडते. म्हणजेच ज्या आर्यन खान प्रकरणाचा आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी नवाब मलिकांनी उपयोग केला. त्याच आर्यन खानचा बाप शाहरुख खान जेलमध्ये गेला तर चालेल मात्र समीर वानखेडे ही जेलमध्ये गेलेच पाहिजे? समीर वानखेडे यांच्यासारखे अधिकारी येतील आणि जातील पण नवाब मलिकांच्या आरोपामुळे एनसीबी यंत्रणा बदनाम होत आहे. यामुळे ड्रग माफियांची हिंमत वाढेल. मग कोणताच अधिकारी ड्रग माफियां विरोधात कारवाई करायला धजावणार नाही. मग प्रत्येक तरुणांच्या खिशात ड्रगच्या पुढया सापडतील. जसा पंजाब ड्रगच्या विळख्यात सापडला तसाच महाराष्ट्र सापडेल. मग हा महाराष्ट्र फुले, आंबेडकर, शाहूंचा म्हणण्याऐवजी हा ड्रग माफियांचा महाराष्ट्र म्हटला जाईल याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे.
COMMENTS