भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोर्यात झालेल्या हिंसक संघर्षाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या संघर्षानंतर दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहचला होता.
बीजिंग: भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोर्यात झालेल्या हिंसक संघर्षाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या संघर्षानंतर दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहचला होता. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू आहे. चर्चेच्या जवळपास 11 फेर्या झाल्यानंतरही परिस्थिती ’जैसे थे’च आहे. चीनच्या ’पीपल्स लिबरेशन आर्मी’ने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अतिरिक्त बांधकाम केले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये चीनच्या सैनिकांच्या राहण्याची व्यवस्थादेखील आहे. त्याशिवाय या भागांमध्ये रस्ते, बंकर, पायाभूत सुविधा, रुग्णालयेदेखील उभारण्यात आली आहेत. दीर्घकाळ राहण्यासाठी चीनकडून ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
चिनी सैन्याने रुडोक, कांग्शीवार, ग्यानत्से आणि गोलमुड भागात कायमस्वरुपी आणि तात्पुरती अतिरिक्त घरे बांधली आहेत. ’पीएलए’कडून उभारण्यात आलेली फिल्ड हॉस्पिटल आणि अतिरिक्त ’स्नो मोबिलिटी’ वाहनांमुळे चिनी सैन्य अधिक काळ याठिकाणी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे भारतीय सैनिकांची भीती आणि दुसरीकडे हवामान यांचा सामना करण्याची तयारी चिनी सैन्याने केली आहे. मागील वर्षी हिवाळ्यात चिनी सैन्यांची परिस्थिती वाईट झाली होती. चीनने पॅन्गॉग त्सो सरोवर परिसरात तैनात करण्यात आलेल्या चिनी सैन्याची कुमक बदलण्यात आली. तणावाच्या वेळेपासून तैनात असलेल्या ’पीएलए’च्या चौथ्या आणि सहाव्या तुकडीला फेब्रुवारी महिन्यात या भागातून हटवून रुतोंग काउंटी भागात तैनात करण्यात आले होते. तीन आठवड्यांपूर्वी रुतोंगमधूनही त्यांना हटवून शिनजियांग प्रांतातील लष्करी तळावर पाठवण्यात आले. भारतासोबत तणाव असलेल्या ठिकाणी चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले असल्याचे म्हटले जाते. या भागात बंकर, सैनिकांसाठी निवासस्थाने, रुग्णालये, शस्त्रे आगार आदी युद्धासाठी आवश्यक असणार्या पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. चिनी सैन्याने तिबेट आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमा भागातही यु्द्ध सराव केला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात, ’पीएलए’ने शिबत्से, तिबेटमध्ये लहान शस्त्रांच्या युद्ध सरावाचे आयोजन केले होते. या दरम्यान, चिनी सैन्याने अँटी-टँक रॉकेट लाँचर्स, ग्रेनेड लाँचर, अँटी एअरक्राफ्ट मशिनगनसह अनेक लहान शस्त्रे वापरली. चीनमधील ’ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तानुसार, मे महिन्यातही पीएलएने पश्चिम थिएटर कमांड अंतर्गत शिनजियांग लष्करी जिल्ह्यात 5200 मीटर उंच मारा करणार्या तोफखान्याचे एक युनिट तैनात केले आहे.
COMMENTS